मुख्य बातम्या:

भाजपच्या नगरसेवकाला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक

यवतमाळ,दि.21- वणी शहरातील एका युवतीवर किशोरवयापासून सतत लैंगिक अत्याचार केल्याची घटना युवतीने दिलेल्या तक्रारीवरून उजेडात आली आहे. याप्रकरणी भाजपच्या नराधम नगरसेवकाला दि. २० जुलैला बलात्काराच्या गुन्ह्यात वणी पोलिसांनी अटक करीत विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला. या घटनेने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.प्राप्त माहितीनुसार सहा महिन्यांपूर्वी शहरातील एका काँगेस कार्यकर्त्याने पिडीत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी त्या काँग्रेसी कार्यकर्त्याला कारागृहाची हवा खावी लागली. तर ह्याच घटनेत पिडीतेने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आज घडलेल्या घटनेला आयाम देणारा भाजपचा नगरसेवक धीरज पाते त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्याचा मदतनीस होता.

शहरातील गणेश सोसायटी परिसरात वास्तव्यास असलेली २२ वर्षीय युवती बीएससीमध्ये शिकत आहे. ती किशोरवयात दहावीत असतांना शिकवणीकरिता जात होती. दरम्यान, भाजपाचा नगरसेवक धीरज पाते वय २९ वर्ष, रा.वासेकर ले-आउट हा नेहमी तिचा पाठलाग करायचा. त्याने तिचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी जवळीकता साधली. काही दिवसातच दोघात मैत्री झाली. मैत्रिचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात अडकलेल्या युवतीने त्याच्यावर जीवापाड विश्वास टाकला. मात्र, दोन वर्षानंतर युवती बारावीत शिकत असतांना आरोपी धिरजने तिला घरच्यांना भेटण्याचा बहाणा करीत स्वतःच्या घरी नेले. यावेळी घरी कुणीही नसल्याने संधीचे सोने करीत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक सबंध प्रस्तापित केल्याचे पिडीतेने नमूद केले आहे. त्यानंतर त्याने तिला बदनामी करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. नाईलाजास्तव होत असलेल्या अत्याचार असह्य झाल्याने अखेर युवतीने हा प्रकार घरच्यांना सांगितला. यावरून घरच्यांनी आरोपी धिरजला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मात्र, यावेळी त्याने तिच्या घरच्यांना पाच लाख रुपयांची मागणी केली. यामुळे संतापून पिडीत युवतीने आज, दि. २० जुलै रोजी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली.

Share