गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरु करा:शिवसेनेची मागणी

0
7

गडचिरोली,दि.22: जिल्ह्यात वैद्यकीय सुविधांचा अभाव असून, वैद्यकीय अधिकारी येथे येण्यास येण्यास इच्छूक नसतात. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.यावर एकनाथ शिंदे यांनी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करु. तसेच सप्टेंबर महिन्यात गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर येऊन चर्चा करु, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात उपतालुका प्रमुख यादव लोहंबरे, योगेश कुड़वे, उपशहर प्रमुख संदीप दुधबळे, विभागप्रमुख गजानन नैताम, उपविभागप्रमुख संजय बोबाटे, दिवाकर वैरागडे यांचा समावेश होता.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने २० जुलै रोजी नागपूर येथे सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. गडचिरोली जिल्ह्यातील ११ लाख नागरिकांना आरोग्याची सुविधा पुरविण्यासाठी जवळपास ४५ आरोग्य केंद्रे व उपकेंद्र आहेत. जिल्हा मुख्यालयी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात २५१ खाटाची, तर नव्यानेच सुरु झालेल्या महिला रुग्णालयात १०० खाटाची व्यवस्था आहे. गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या लक्ष्यात घेता येथे आरोग्याची सुविधा पुरेशा प्रमाणात नाही. येथे वैद्यकीय अधिकारी येण्यास अनुत्सुक असतात. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यास अधिष्ठाता व प्राध्यापकाची सेवा या रुग्णाच्या कामी येईल. त्यांचा फायदा  जिल्हावासीयाना होईल, असे अरविंद कात्रटवार यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले.

शासकीय निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्ह्यात असलेल्या भौतिक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. सध्या गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपुर या सीमावर्ती जिल्ह्यसह तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील रुग्णही मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामुळे येथील रुग्णालयात नेहमीच गर्दी असते. येथे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास तेथील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा लाभ होईल. तसेच जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना होणाऱ्या आजाराची कारणे व त्यावर उपाययोजना करण्यासाठीही विद्यार्थ्याना मदत होईल. यासोबतच ग्रामीण भागात अनेक आजारावर वनस्पती औषधीचा वापर केला जातो. त्याचा अभ्यास करुन नवीन औषध निर्मितीसाठी येथील होतकरु विद्यार्थ्यांना मिळेल, असे अरविंद कात्रटवार यांनी मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून दिले.