आश्रमशाळांच्या चौकशीचा वेग वाढला

0
9

गडचिरोली,दि.24ः-आदिवासी प्रकल्पांतर्गत येणार्‍या आश्रमशाळांची चौकशी प्रकरणी दोन अधीक्षक व दोन मुख्याध्यापक निलंबित करण्यात आले आहेत. या चौकशीप्रकरणी मोठे मासे फसण्याची शक्यता संबंधित विभागातील अधिकार्‍याने वर्तविली आहे.
प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आपल्या पदावर रुजू होताच अनेक आर्शमशाळेत भेट देवून चौकशी केली असता, खरेदी-विक्रीसह विद्यार्थ्यांंच्या आहारात अनेक प्रकारच्या त्रुट्या आढळून आल्या. यानुसार प्रकल्प अधिकार्‍यांनी गडचिरोली प्रकल्पात येणार्‍या संपूर्ण आर्शमशाळेत चौकशीचा आदेश दिला. या चौकशीच्या आदेशावरून चौकशी केली असता, अनेक शाळांमध्ये साहित्य खरेदी-विक्रीत अनेक रुपयांची अफरातफर झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर दोन आर्शमशाळेतील मुख्याध्यापकांसह अधीक्षकावर निलंबनाची कारवाई प्रकल्प अधिकार्‍यांनी केली. मात्र, अद्यापही २२ शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक रडारवर असल्याचे सांगितले जात आहे.
या चौकशीदरम्यान प्रकल्प कार्यालयाचे मोठे मासेदेखील फसण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. पुढील चौकशीचा अहवाल आल्यानंतर आणखी कोणाकोणावर निलंबनाची कारवाई होणार याकडे सर्वांंंचे लक्ष लागले आहे. एका पुरवठाधारकाने स्थानिक व्यापार्‍याकडून २७४0 या दराने तांदूळ खरेदी करून आर्शमशाळेत २२६0 रूपयाने पुरवठा केला. हे गणित मात्र समजलेले नाही. याबाबतही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या गणितात जास्त पुरवठा सांगून कमी पुरवठा केल्याचा संशय वर्तवला जात आहे. कुरंडी माल व रेगडी येथील अधीक्षकावर अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.