क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- बडोले

0
43

मुंबई, दि. 24 : मातंग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी गठीत केलेल्या क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिले.क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. बडोले म्हणाले, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशी या मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहेत. बेरोजगार तरुणांना रोजगार, मातंग समाजातील महिला बचत गट स्थापन करण्यासाठी विशेष प्रोत्साहन, दारिद्रय निर्मूलन करण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम, सरकारी स्वस्त धान्य दुकान, रॉकेल, गॅस व पेट्रोल एजन्सी मातंग समाजातील बेरोजगार तरुणांना विशेष प्राधान्यक्रमाने देण्यात यावे. मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात पुणे व औरंगाबाद येथे वसतीगृह,  पाच ठिकाणी निवासी शाळा स्थापन करण्याबाबतची कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश यावेळी श्री. बडोले यांनी दिले.