*कॅन्सर : एक बागुलबोवा!*

0
10
सोनाली बेंद्रे आणि त्यापूर्वी आणखी एक महत्वाचा सिनेकलाकार (इरफान खान) यांना कॅन्सर ने ग्रासलंय, असे आता समाज माध्यमाच्या (Social Media च्या) कृपेने सा-या भारतालाच नव्हे तर सा-या जगाला कळले आहे. म्हणजे “कॅन्सर ने ग्रासणे” हे प्रकरण एक EVENT म्हणून साजरे करून कँसरला घाबरूनही न घाबरल्याची फुशारकी मारण्याचाच प्रकार वाटतो मला! वस्तूतः कँसर हा आजार आता काही पूूूर्वीसारखा घाबरवणारा व असाध्य राहिलेला नाही. कितीतरी व्यक्ती आज कँसरमुक्त होऊन नाॅर्मल जीवन जगत आहेत, त्यापैकी मी सुद्धा एक आहे. म्हणजे झाले असे की, जुलै 2010 मध्ये मला सुद्धा या कॅन्सरने RENAL CELL CARCINOMA (किडनी कॅन्सर) या अतिसुंदर नावाने ग्रासले होते. त्यामुळे मला माझी उजवी किडनी कॅन्सरला दान द्यावी लागली, रेडिएशन चा उपचार घ्यावा लागला, आयुर्वेद व जंगली जडीबूटी चा उपचार घ्यावा लागला, किमोथेरपी या “अवास्तव” थेरपीला फाटा दिला, जप-हवन सल्ल्याचा वापर केला,  वगैरे, वगैरे…..! डिसेंबर 2012 पर्यंत या कॅन्सर मित्राने अभिन्न मैत्री निभावली. मैत्री मुळे मी कॅन्सर ला नावे(!) ठेवू शकत नाही. कॅन्सरच्या या मैत्री दरम्यान मी, शस्त्रक्रियेचा काही कालावधी सोडल्यास, महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात जिउनि या जिल्हा प्रमुख पदाचे काम अगदी सुरळीतपणे व चोखपणे सांभाळले होते.
शिवाय कॅन्सर शी मैत्री होण्यापूर्वी जानेवारी 2009 मध्ये माझा एक “भयानक” अपघात (100% Brechial Plexus Injury) होऊन माझा डावा हात पूर्णतः व डावाच पाय अंशतः विकलांग झाला होता/आहे, तरी कॅन्सर ने माझा अपवाद न करता माझ्याशी मैत्री केलीच. या कॅन्सर-मैत्री दरम्यानच्या उपचारात डाॅक्टरच्या चूकीने माझ्या छोट्या आतडीला सुई टोचून एक छिद्र पडले. त्या छिद्रातून खाल्लेल्या अन्नाचा पेस्ट रोजच बाहेर पडेे. त्या पेस्टला  मीच नव्हेे तर माझे डाॅॅक्टर सुद्धा pus समजायचो व त्यानुसार उपचार सुमारे नऊ-दहा महिने सुरू होते.  माझी पत्नी त्याच्या बाह्यटोकावर रोज घरीच बॅण्डेज करून द्यायची! कोणत्याही उपचारांना दाद न मिळाल्यानेे शेेवटी सखोल तपासणी केली असता “छोट्या आतडीला छिद्र” पडल्याचे निष्पन्न झाले. मग त्यासाठी पुन्हा एक जीवघेणी शस्त्रक्रिया करावी लागली होती.
या माझ्या स्वानुभवावरून व इतरही कँसरमुक्त झालेल्या व्यक्तींच्या मी वाचलेल्या अनुभवावरून, मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की, खरोखरच कँसरने मृत्यू पावणा-या रोगग्रस्तांच्या संख्येपेक्षा कँसरच्या फक्त भितीनेच मृत्यू पावलेल्यांची संख्या कितीतरी जास्त असावी. कँसर असाध्य नाही, वस्तूतः पृथ्वीच्या पाठीवरील कोणताही रोग, आजार, बिमारी, दुखणे असाध्य नाही. निसर्गाजवळ प्रत्येक रोग, आजार, बिमारी, दुखणे याचा रामबाण (100% अचूक) उपाय उपलब्ध आहे. आवश्यकता आहे ती बिलकुलही न घाबरता धैर्याने त्या-त्या रोग, आजार, बिमारी, दुखण्याचा मुकाबला करत करत योग्य उपचार घेत राहिल्यास व शक्यतो आपले रोजचे रूटीन जीवन (गर्दीतील एकांतासह) जगत राहिल्यास या सर्वांपासून मनुष्य पूर्णतः बरा व मुक्त होऊ शकतो. पुनश्च सांगतो की, ही कोरी सांत्वना नव्हे, मी स्वतः या सर्व प्रक्रियेतून जाऊन अनुभव घेतलाय, त्याचा माझ्या या सांगण्याला भक्कम आधार आहे. या सर्वांना घाबरून, सहानुभूती विकत घेण्यासाठी कोणताही event साजरा करण्याची गरज नाही. अशी कोणतीही कृती मलातरी पळपुटेपणाची द्योतक वाटते. या कालावधीत गर्दीतील एकांत स्वीकारून धैर्याने आधुनिक पॅथी सोबतच पारंपारिक पॅथी/जडीबुटी व औषधोपचार तथा मानसिक संतुलनासाठी जप-हवनादिचा यथोचित (अंधश्रद्धा त्यागून) वापर करून कोणालाही कँसरमुक्त होता येईल, हे मी पुनश्च पुनश्च स्वानुभवावरून व आत्मविश्वासाने सांगू इच्छितो.
जय हो! चला कँसरवर सुद्धा विजय मिळवू या व तो विजय साजराही करू या, पण विजयानंतर! त्याला घाबरून त्याचा event करून त्याला जास्तीचा भाव(!) देण्याची प्रथा थांबवू या! पुनश्च जय हो! जय जय हो!

@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902.ता.आमगांव, जि.गोंदिया. (8766549828)