कुख्यात व्याघ्र तस्कर कुट्ट पारधी याला दोन वर्षांचा कारावास

0
11

भंडारा,दि.28ः- वाघांच्या शिकारीत तरबेज असलेल्या बहेलिया टोळीतील कुख्यात तस्कर राहूल उर्फ कुट्ट गुलाबसिंग गोंड ठाकूर उर्फ पारधी रा. बकड्या ता. धनेरा जि. खंडवा (म.प्र.) याला पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याप्रकरणी लाखांदूर न्यायालयाने दोन वर्ष सर्शम कारावासाची शिक्षा सुनावली. कुट्ट पारधी याला वाघांच्या शिकारप्रकरणी तुमसर व पवनी न्यायालयाने यापूर्वीच शिक्षा सुनावली आहे. तेव्हापासून तो भंडारा कारागृहात आहे.
२१ जानेवारी २0१६ रोजी वाघाच्या शिकारप्रकरणाची पेशी असल्याने कुट्ट पारधी याला पोलिस बंदोबस्तात भंडारा येथून वडसा (जि.गडचिरोली) येथील न्यायालयात नेण्यात आले होते. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर एसटी बसने परत येत असताना दिघोरी (मोठी) ता. लाखांदूर जवळ त्याने लघुशंका लागल्याचे सांगत एसटी बस थांबविली. पोलिस कर्मचारी त्याला घेऊन खाली उतरले असता तो हातकडी व दोरासह पळून गेला होता. याप्रकरणी दिघोरी (मोठी) पोलिसात त्याच्याविरोधात भादंविच्या कलम २२४, ३५३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सहा महिन्यानंतर चंदन तस्करीच्या प्रयत्नात असताना उत्तरप्रदेश पोलिसांनी कुट्ट पारधीला लखीमपूर खिरी येथे अटक केली होती. त्यानंतर त्याला भंडारा येथे आणण्यात आले. त्याला लाखांदूर न्यायालयात हजर केल्यानंतर तत्कालिन तपास अधिकारी प्रशांत कोलवाडकर यांनी दोषारोप पत्र सादर केले. सदर गुन्ह्याची सुनावनी लाखांदूरचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए.एस. सुरजुसे यांच्या न्यायालयात दीड वर्ष चालली. सरकारी अभियोक्ता उमेश समरीत यांनी योग्य बाजू मांडून साक्षदार तपासले. २५ जुलै रोजी न्यायालयाने आरोपी राहूल उर्फ कुट्ट गुलाबसिंग उर्फ कन्हैय्यालाल गोंड ठाकूर उर्फ पारधी याला भादंविच्या कलम २२४, ३५३ अन्वये दोन वर्ष सर्शम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताना कुट्ट पारधी न्यायालयात हजर होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन पोलिस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलिस नायक रोशन गजभिये यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून दिघोरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बबन पुसाटे, निलेश गावंडे, पोलिस शिपाई मेघराज गावंडे यांनी काम पाहिले.