‘युएई’विरुद्ध औपचारिक विजय

0
13

पर्थ (ऑस्ट्रेलिया) -विश्‍वकरंडकातील संयुक्त अरब अमिरातीचा (युएई) विरुद्धच्या सामन्यात भारताने आज (शनिवार) युएईचा नऊ गडी राखून सहज आणि एकतर्फी पराभव करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या विजयासह भारताने विश्‍वकरंडकातील विजयाची हॅट्रिक साजरी केली आहे. प्रथम फलंदाजी करताना युएईने भारतासमोर विजयासाठी सर्वबाद 102 धावा उभ्या केल्या होत्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताने एका बळीच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. भारताच्या वतीने रोहित शर्माने नाबाद 52 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीनेही नाबाद 33 धावा केल्या. तर शिखर धवननेही 14 धावांचे योगदान दिले.

विश्‍वकरंडक स्पर्धेमधील भारताविरुद्धच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीचा (युएई) डाव आज (शनिवार) अवघ्या 102 धावांत आटोपला. भुवनेश्‍वर कुमार (19 धावा – 1 बळी), उमेश यादव (15 धावा – 2 बळी), रवीचंद्रन आश्‍विन (25 धावा – 4 बळी), मोहित शर्मा (16 धावा -1 बळी) व रवींद्र जडेजा (23 धवा – 2 बळी) अशा भारताच्या सर्वच गोलंदाजांना या सामन्यात यश लाभले. विशेषत: आश्‍विन व जडेजा या फिरकीपटूंनी एकत्रितरित्या 6 बळी घेत युएईच्या डावास खिंडार पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मुहम्मद ताकीर या युएईच्या अखेरच्या फलंदाजाचा यादव याने त्रिफळा उडवित युएईचा संघर्ष संपुष्टात आणला. युएईच्या शैमान अन्वर याने 49 चेंडूंत 35 धावा करत डावामधील सर्वोच्च धावसंख्या नोंदविली. भारताविरुद्धच्या कोणत्याही संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेत नोंदविलेली ही नीचांकी धावसंख्या आहे. तत्पूर्वी युएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाविरुद्धचे सामने जिंकलेल्या भारताचे हा सामनाही जिंकून ब गटामधील आपले अग्रस्थान कायम ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.