लढाऊ शिवराय जन्माला घालण्यासाठी प्रत्येक जिजाऊने सज्ज व्हावे

0
19

गडचिरोली, ता.२८सुशिक्षित महिलाच अंधश्रद्धेच्या आहारी जात असल्याने त्यांच्या प्रगतीच्या वाटेत अडथळे निर्माण होत आहेत. महिलांनी अंधश्रद्धा सोडून लढवय्‍ये शिवाजी निर्माण करण्यासाठी सज्ज असावे, असे आवाहन पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.सुषमा अंधारे यांनी आज येथे केले. येथील बहुजन युवा मंचच्या वतीने संत गाडगेमहाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिनव लाॅनवर आयोजित सामाजिक प्रबोधन मेळाव्यात ‘राजे तुम्ही यायलाच हवं’ या विषयावर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसपाचे जिल्हाध्यक्ष विलास कोडापे हे होते. ओबीसी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन झाले. मंचावर एल.के.मडावी, दीपक कोटरंगे, दर्शना मेश्राम, डॉ.कैलास नगराळे उपस्थित होते.
प्रा.सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. शिवरायांनी सर्व जाती, धर्माच्या नागरिकांना समानतेची वागणूक दिली. परंतु अलिकडे शिवरायांचे नाव घेऊन काही लोक जाती, धर्माचे राजकारण करीत आहेत. छत्रपतींचा उदोउदो करीत असताना काही राजकारणी मंडळी सामान्य नागरिकांना मानाचे स्थान न देता घराणेशाही चालवीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.शिवराय, फुले-आंबेडकरांच्या या भूमीत अजूनही अन्याय, अत्याचार होतच आहेत. अशा वेळी ‘राजे तुम्ही यायलाच हवं’,अशी आर्जव करून प्रा.डॉ.अंधारे यांनी छत्रपती शिवरायांसारखे लढाऊ राजे घरोघरी निर्माण करण्यासाठी महिलांनी तयार असावे, असे आवाहन केले.
राज्यघटनेने महिलांना आरक्षण दिले असले, तरी आता संरक्षण देण्याची खरी गरज आहे, असे सांगून प्रा.डॉ.अंधारे यांनी समाजव्यवस्था बदलण्याची गरज प्रतिपादीत केली.
अंधश्रद्धा हाच महिलांच्या प्रगतीतील अडथळा असून, तो दूर करून महिलांनी विज्ञानवादी दृष्टीकोन अंगिकारावा, असेही त्या म्हणाल्या.
व्यवस्था परिवर्तनाच्या लढयात आता बाहेरून आणि आतूनही शत्रू निर्माण होत आहेत, त्यांच्यापासून सावध असावे, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी नागपूर येथील साहित्यिक एल.के.मडावी यांनी‘भारतीय राज्यघटना आणि पेसा कायदा’या विषयावर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन श्‍याम रामटेके, तर प्रास्ताविक डॉ.कैलास नगराळे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नरेश वाकडे, मिलिंद बांबोळे, राज बन्सोड, देवा वनकर यांनी सहकार्य केले.