जिल्हा सामान्य रुग्णालयात दोघे दगावले

0
15

गडचिरोली, ता.२८: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्याकडे डॉक्टरांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, रुग्णांचे हाल होत आहेत. अशातच आज २८ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास दोन रुग्ण दगावल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गडचिरोली येथे प्रशस्त जिल्हा सामान्य रुग्णालय असल्याने गडचिरोलीी जिल्ह़यातील दुर्गम भागासह शेजारच्या जिल्ह़यातील रुग्णही येथे उपचारासाठी मोठया प्रमाणावर येत असतात. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने काही डॉक्टर व परिचारिका कर्तव्यात कसूर करीत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ मध्ये काल २७ फेब्रुवारीच्या सकाळी डॉक्टर आले होते. परंतु त्यानंतर डॉक्टर व परिचारिकांनी या वॉर्डाकडे लक्ष दिले नाही, असे रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी सांगितले. डोक्याला दुखापत व अन्य गंभीर आजाराचे रुग्ण असतानाही व्यवस्थित उपचार होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. डॉक्टर व परिचारिकांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज सकाळी दोन रुग्णांना जीव गमवावा लागला. त्यात तोडासे नामक एक रुग्ण पांढरसडा येथील असून, दुसरा मृत रुग्ण चंद्रपूर जिल्ह़यातील जुनासुर्ला येथील आहे.