भंडारा येथील ‘नवोदय’चा प्रश्न पेटणार

0
16

भंडारा,दि.31ः- जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्थानांतरणाचा प्रश्न आता चांगला पेटताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने या अनुषंगाने बोलाविलेली पालकांची सभा कोणताही तोडगा न निघताच गुंडाळल्या गेली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या स्थानांतरणाला परवानगी द्यावी, यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळया पद्धतीने दडपण आणण्याचे प्रयत्न होत होते. मात्र कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे स्थानांतरण होऊ देणार नाही, प्रशासनाने पर्यायी इमारतीची व्यवस्था करावी यावर पालक ठाम होते. दरम्यान उपविभागीय अधिकार्‍यांच्या काही अपमानास्पद वक्तव्यांमुळे वातावरण चांगलेच तापले होते. अखेर त्यांना माफीही मागावी लागली!
तब्बल १७ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भंडारा जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु झाले. इमारतीची कायमस्वरुपी व्यवस्था होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या जकातदार कन्या शाळेत विद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी इमारतीची पहाणी करुन ३ ते ४ वर्ष इमारतीला काहीही होणार नाही, असे सांगितल्या गेल्याने त्यावर १६ लाख रुपये खर्च करण्यात आले. मागील वर्षी ४0 विद्यार्थ्यांची एक तुकडीही झाली. मात्र आता ही इमारत राहण्यायोग्य नसल्याचा निर्वाळा दिला आणि नवोदय विद्यालयाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
इमारत धोक्याची असल्याचे माहित असूनही प्रशासनाने आतापर्यंंत हालचाली केल्या नाहीत. आता पालक आक्रमक व्हायला लागताच विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्यातील नवोदय विद्यालयांमध्ये हलविण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी अन्यत्र गेल्यास भंडारा जिल्ह्यातील नवोदय विद्यालय पूर्णपणे बंद होईल. दरम्यान, विषय एवढा गंभीर असून एकदाही जिल्हाधिकारी विद्यालयात येऊन पहाणी करुन न गेल्याने पालकांमध्ये आणखीच रोष आहे.
दरम्यान आज प्रशासनाने पालकांची बैठक बोलविली. उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, गोंदिया नवोदयचे प्राचार्य बलवीर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. व्यवस्था होईपर्यंंत विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्यात हलविण्याचा मुद्दा पुढे मांडण्यात आला. मात्र पालकांनी याला स्पष्ट नकार दिला. उपस्थित अधिकारी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पालकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पहाण्यास तयार नव्हते.
जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीनंतरही कोणताच तोडगा निघू शकला नाही. प्रशासन पर्यायी जागा शोधण्याच्या विषयावर काहीही बोलण्यास तयार नव्हते. त्यामुळे पालकांनीही विद्यार्थ्यांंना न पाठविण्याचा हट्ट कायम ठेवला. आज तोडगा निघाला नसल्याने आता हा विषय उग्र रुप धारण करेल, असे सांगताना आता सर्व विद्यार्थ्यांंना जिल्हाधिकार्‍यांच्या बंगल्यात सोडण्यात येईल, तेथेच त्यांची व्यवस्था केली जावी, अशी भूमिका पालकांनी बोलून दाखविली