मुख्याध्यापकाला लाच घेताना पकडले

0
10

तुमसर,दि.01 : पगार बिल काढण्यासाठी आपल्याच संस्थेच्या विशेष शिक्षकाला लाच मागणाऱ्या तुमसर येथील ज्ञानगंगा मतिमंद शाळेच्या मुख्याध्यापकाला सहा हजार रुपयांची लाच घेताना भंडारा येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आले.
गणेश कंठीराम मेहर (३१) असे लाचखोर प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. तो तुमसर येथील ज्ञानगंगा मतिमंद शाळेत कार्यरत आहे. आपल्याच संस्थेतील एका विशेष शिक्षकाला पगार बिल आणि मिनीबस मेंटनन्सचा खर्च काढण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकाराची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. यावरुन सापळा रचण्यात आला. मुख्याध्यापक गणेश मेहर भंडारा येथील जिल्हा परिषदेच्या परिसरात पैसे घेत असताना पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्याच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी प्रतापराव भोसले आदींनी केली.