महिलांच्या गोल्डन गॅंगला अटक

0
17

नागपूर,दि.01 – ऑटोत प्रवासी असल्याचे भासवून चोरी करणाऱ्या टोळीने नागपूर पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. या टोळीची शहरात चांगलीच दशहत निर्माण झाली होती. मात्र, गुन्हे शाखेने या टोळीचा पर्दाफाश करीत पाच चोरट्यांना अटक केली. तसेच चोरीचे सोने विकत घेणाऱ्या दोन सराफाच्याही पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. त्यांच्याकडून आतापर्यंत १० लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. अटकेतील आरोपींमध्ये छाया ऊर्फ मनीषा अनिल खोब्रागडे (३८,रामटेकेनगर टोली), शोभा प्रमोद वाटकर (६५), जया ज्ञानी डोंगरे (२५,मनीषनगर), रोशन प्रल्हाद खोब्रागडे (४०,शताब्दीनगर) आणि शुभम चंदू बोरकर (२२, हावरापेठ) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणात चोरीचा माल खरेदी करणाऱ्या कन्हानमधील सराफा व्यापारी संजय दीगपती आणि रविकिरण गुरव यांनाही अटक केली. या टोळीची म्होरक्‍या छाया ऊर्फ मनीषा खोब्रागडे आहे. पोलिसांना माहिती मिळाली होती की ऑटोमध्ये प्रवासादरम्यान लोकांच्या पर्समधून दागिने आणि पैसे चोरी करणारी टोळी ऑटो क्र. एमएच-३१/सीव्ही-६१३० मधून ओंकारनगर चौकातून जात आहे. माहितीच्या आधारावर पोलिसांनी पाठलाग करून ऑटोला छत्रपती चौकाजवळ पकडले. ही कारवाई डीसीपी संभाजी कदम आणि एसीपी संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनात एपीआय किरण चौगुले, प्रदीप अतुलकर, पीएसआय मनीष वाकोडे, पोहवा बट्टूलाल पांडेय, रमेश उमाठे, सतीश मेश्राम, नरसिंह दमाहे, अजय रोडे, देवेंद्र चव्हाण, सुधाकर धंदर यांनी केली.