वृक्षतोड करणार्‍या माजी सरपंचास अटक

0
9

लाखांदूर,दि.02ः-सामाजिक वनिकरणा अंतर्गत चुलबंद नदीकाठावर शासकीय जागेत लावण्यात आलेल्या शिसम जातीच्या दोन वृक्षांची कत्तल करून तोडलेली लाकडे ट्रॅक्टरने नेणार्‍या विद्यमान सरपंचाच्या पतीस गावकर्‍यांनी रंगेहाथ पकडले.
शामराव बेंदवार असे माजी सरपंचाचे नाव आहे. अवैधरित्या वृक्षतोड करून ट्रॅक्टरने चोरून नेत असल्याचे आढळून आले. यावेळी तंमुस अध्यक्ष भाष्कर मदनकर, सुधीर राऊत, बाळकृष्ण द्रुगकर, विजय ब्राम्हणकर, वासुदेव काटेखाये, खिलाराम लांजेवार, मनोज ब्राम्हणकर, रविंद्र राऊत, जितू ब्राम्हणकर, श्रीपत द्रुगकर उपस्थित होते. घटनेची माहिती पोलिसांना व वनविभागाला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे किटाळी येथील वनक्षेत्राधिकारी शेख यांनी चौकशी करून तक्रार दाखल करीत तोडलेली लाकडे ताब्यात घेतली. मात्र, वृक्षतोड करण्यात आलेल्या नर्सरीची जागा वनविभागाकडे अधिग्रहीत नसल्याने वनविभागातर्फे प्राथमिक चौकशी करून सदर प्रकरण पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांकडे हस्तांतरीत करणार आहेत. सरपंचाचे पती वृक्षांची अवैधरित्या कत्तल करती असताना सरपंचावर देखील पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेऊन कारवाई करून पदमुक्त करण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.