बदली प्रकरणाला घेवून शिक्षकांचा एल्गार;उपोषणाला सुरुवात

0
10
गोंदिया,दि.२ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या बदली प्रक्रिया यंदा राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांची स्थिती व शिक्षकांचे समायोजन याची पुरेपुर माहिती पुरविण्यात अपयशी ठरल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीमध्ये अनेक त्रुट्या निर्माण झाल्या. यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाल्याचे कारण पुढे करून समता संग्राम परिषद तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने या अन्यायाविरोधात आज (दि.२) पासून जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.
दरवर्षी स्थानिकस्तरावर शिक्षक  स्थानांतरण प्रक्रियेमध्ये होणारा घोळ थांबविण्यासाठी यावर्षी राज्य शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने ऑनलाईन पद्धतीने स्थानांतरण करण्याचा निर्णय घेतला. ऑनलाईन पद्धतीमध्ये स्थानांतरणासाठी पात्र असलेल्या शिक्षकांना वैक्तिक सेवा काळाची माहिती भरणे होते. याबाबत सर्व तपासणी शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी कार्यालयाची होती. त्याचबरोबर शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांची पदस्थापना विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर पदे या सर्व बाबतची माहिती पुरविले होते. मात्र, शिक्षक आणि जिल्हा परिषद यंत्रणेकडून जबाबदारीने कार्य करण्यात आले नाही. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने झालेल्या शिक्षक बदली प्रक्रियेत घोळ निर्माण झाले. ही बाब शिक्षकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, ही बाब आपल्या अखत्यारीत नसल्याचे सांगून शिक्षण विभाग हात झटकत असल्याने झालेले अन्यायाविरोधात शिक्षकांनी उपोषणाचा अस्त्र उगारला आहे. आजपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर समता संग्राम परिषद व कास्ट्राईब शिक्षक संघाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.
उपोषणात सतीश बन्सोड, विनोद मेश्राम, दिलीप मेश्राम, विजय सूर्यवंशी, एस.यू. वंजारी, आर.एम. बोपचे, मनोज गणविर, सिद्धार्थ ठवरे, विनोद हुमने, रामकृष्ण चौरागडे, सुरेश पटले, कु.ए.के. बिसेन, एन.एस. भुरे, आर.एस. चौधरी, जे.एस. बावीसकर, डी.एल. साखरकर यासह मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.