सागवान वृक्षाची तस्करी करणारे जाळ्यात

0
19

सडक-अर्जुनी,दि.03 : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील खोबा बिट क्रमांक १ मधील कंपार्टमेंट क्रमांक २१५ मध्ये सागवान वृक्षाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पकडण्यात वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार खोबा हलबी जवळ असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील खोबा बिट क्रमांक १, कंपार्टमेंट क्रमांक २१५ मधील कमकाझरी परिसरातील सागवान वृक्षाची तस्करी मागील काही दिवसांपासून सुरू होती. वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे व त्यांचे वन कर्मचाऱ्यांनी या परिसरात रात्री गस्त घालून सागवान तस्करांना रंगेहात पकडले. यात मधुकर केवळराम धानगाये (४५), राजकुमार माधोराव पर्वते (४०), टिंबराम पुंडलिक लांबकासे (४०) यांचा समावेश असून अजून चार आरोपी फरार आहेत. या आरोपींना ४ आॅगस्टपर्यंत वन कोठडी देण्यात आली.
तस्करी करण्यात आलेल्या सागवान वृक्षाची अंदाजे किमत १० हजार असल्याची माहिती आहे. पुढील तपास नवेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, सारीका दहिवले, कोकणाचे वनक्षेत्र सहाय्यक ए.वाय.शेख, वनरक्षक राकेश धकाते, लक्ष्मण चोले, श्रावण धनस्कर, परशुराम जोशी, राजेश सूर्यवंशी करीत आहे.