धोबी समाजाला अनु.जातीचे आरक्षण द्या

0
22

नागपूर,दि.04ः-धोबी समाजाला अनुसूचित जाती (एससी) चे आरक्षण ताबडतोब लागू करा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाच्या शिष्टमंडळाने गृहशाखेचे तहसीलदार पोहनकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
१ मे १९६0 पूर्वी महाराष्ट्रातील भंडारा व बुलढाणा या जिल्हय़ातील धोबी समाजाला अनु. जातीच्या सवलती मिळत होत्या. मात्र, भाषिक प्रांत रचनेनंतर हिंदी भाषिकाचे मध्यप्रदेश व मराठी भाषिकांच्या महाराष्ट्राची निर्मिती झाली. राज्य बदलले तर जात बदलते काय? पण, धोबी समाजाची १ मे १९६0 पूर्वीची भंडारा व बुलढाणा जिल्हय़ातील अनु. जातीची सवलत महाराष्ट्र शासनाने काढून घेतली. १९६७ च्या शेड्यूल कास्ट अमेंन्टमेंटनुसार क्षेत्रबंधन उठून आज महाराष्ट्रातील संपूर्ण धोबी समाजाला अनु. जातीची सवलत मिळायला पाहिजे होती. या मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.
देशातील १७ राज्य व ५ केंद्रशासित प्रदेशात धोबी समाज अनु. जातीमध्ये असल्याने व डॉ. दशरथ भांडे समितीचा अहवाल राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र शासनाला पाठवावा. अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंडळाचे प्रदेश मुख्य संघटक संजय भिलकर, शहराध्यक्ष मनीष वानखेडे, नितीन रामटेककर, रमेश काळे, मनोज कापसे, राजू सेलोकर, दीपक सौदागार, घनश्याम कनोजिया, अरविंद क्षीरसागर, नरेंद्र क्षीरसागर, रमेश मोकलकर, योगेश शिरपूरकर, किशोर चव्हाण, भीमलाल दुधमोगरे, प्रकाश जुनघरे, पंकज वरणकर, पप्पू चौरसिया आदींनी दिला आहे.