ओबीसी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षणासाठी धरणे

0
21

भंडारा,दि.05ः-संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना ओबीसी जनगणनेसह, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण  आणि विविध मागण्यांसाठी शनिवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.ओबीसी अन्याय निवारण संघर्ष समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
राज्यात ओबीसी नागरिकांची संख्या मोठी आहे. परंतु, या समाजाला केवळ २७ टक्के आरक्षण लागू केलेले आहे. गेल्या काही वर्षात ओबीसी समाजाला आरक्षण, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही. पात्रता असूनही शासकीय नोकरी मिळत नाही. या प्रकारामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला आहे. या अन्यायाच्या विरोधात ओबीसी समाजाच्या संघटनांनी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
ओबीसी प्रवर्गात अनेक नवीन जाती समाविष्ट करून ओबीसींची संख्या वाढविली. परंतु, आरक्षणाची र्मयादा वाढविण्याऐवजी २७ टक्के वरून १९ टक्के आणली. प्रत्यक्षात तेवढेही आरक्षण दिले जात नाही. नव्या प्रगत जाती ओबीसींमध्ये समाविष्ट करून ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा खेळ सुरू आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, वैद्यकीय प्रवेश प्रक्रि येमध्ये ओबीसी प्रवर्गाला २७ टक्केपैकी १.९ टक्के इतके आरक्षण दिले आहे. ते आरक्षण २७ टक्के दिले जावे. नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत ओबीसींना आरक्षण नाही. ते २७ टक्के आरक्षण देण्यात यावे. ओबीसी समूहातील सर्व जातींची क्रि मीलिअरची अट रद्द करण्यात यावी. ओबीसी कर्मचार्‍यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे. ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी. शेतकर्‍यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या. शेतकर्‍यांना शंभर टक्के अनुदान द्यावे. राष्ट्रीय इतर मागासवर्गिय आयोगाला संवैधानिक दर्जा मिळावा. ओबीसी स्वतंत्र मतदार संघ स्थापन करावा. ६0 वर्षे वयोगटावरील शेतकरी, मजूर व कामगारांना पेंशन लागू करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारकडून ओबीसींवर कसा अन्याय केला जात आहे, याबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
आंदोलनानंतर संध्याकाळच्या सुमारास जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे महासचिव शिशिर कटरे,ओबीसी सेवा संघाचे डाॅ.संजिव रहागंडाले,महेंद्र बिसेन,पप्पू पटले यांनी सहभाग घेत आंदोलनाला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी संघर्ष कृती समितीचा पुर्ण पाठिंबा असल्याचे जाहिर केले.तसेच राजकीय व्यक्ती ओबीसी समाजाला फक्त मतासाठी वापरत असल्याने सावध होण्याची वेळ असल्याचेही आवाहन करण्यात आले.या आंदोलनात समन्वयक सदानंद इलमे, पांडुरंग फुंडे, मुरलीधर भर्रे, भय्याजी लांबट, गोपाल सेलोकर, गोपाल देशमुख, उमेश सिंगनजुडे, रमेश शहारे, प्रभू मने, शालिकराम कुकडे, सूर्यकांत इलमे, मनोज बोरकर, मंगला डहाके, रोशनी पडोळे, नेपाल चिचमलकर, दुर्याेधन अतकारी, धनराज झंझाड, महेश कुथे, केशव बांते, मधुकर चौधरी, गणराज दोनाडकर, भाऊराव सार्वे, माधवराव फसाटे, जयश्री बोरकर, वनिता कुथे, सुभाष आजबले, संजय एकापूरे, धनराज साठवणे, के.झेड. शेंडे, पांडुरंग खाटीक आदी समाजबांधव उपस्थित होते.