भंडारा जिल्हा काँग्रेसचा पालकमंत्र्यांना घेराव

0
14

भंडारा दि.८ :: १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपांना अत्यल्प वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांचे नेतृत्वात पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात आला.
शेतकऱ्यांच्या वाढत्या समस्या लक्षात असताना केवळ कोरडे आश्वासन दिले जात आहे, असा आरोप करून नाना पटोले यांनी पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचे आवाहन केले होेते. त्या अनषंगाने सोमवारला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पालकमंत्र्यांना घेराव करून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. राज्याचे ऊर्जामंत्री म्हणून शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्याचे आश्वासन दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना आठ तासापेक्षा कमी वीज पुरवठा होत आहे. कृषीपंपावर आधारीत शेतकरी संकटात सापडला आहे. आश्वासनाची पुर्तता करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४ तास सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करण्यात येईल, असा सज्जड दम देण्यात आला. ना. बावनकुळे यांनी बुधवारपासून ३१ आॅक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास व रात्रीला सहा तास वीज पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनाची पुर्तता न झाल्यास जिल्ह्यातील प्रवेशावर बंदी आणावी असे आश्वासन पालकमंत्र्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रशांत पवार, जिल्हा परिषद सभापती प्रेम वनवे, रेखा वासनिक, अमर रगडे, डॉ. पंकज कारेमोरे, प्रदीप बुराडे, मुकूंद साखरकर, कमलाकर निखाडे, प्रशांत देशकर आदी उपस्थित होते.