माविमच्या माध्यमातून महिलांनी सक्षम व्हावे- गोपालदास अग्रवाल

0
17

गोंदिया,दि.८ : महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणीत आहे. तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न देखील करीत आहे. त्यामुळे माविमच्या माध्यमातून महिलांनी सक्षम व्हावे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.जलाराम लॉन गोंदिया येथे आयोजित महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने गोंदिया तालुक्यातील माविमच्या बचतगटातील महिलांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्यात उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी हया होत्या.
यावेळी जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, महिला व बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प.सदस्य रजनी गौतम, नगरसेविका भावना कदम, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्लारे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी व्यवस्थापक बी.एम.शिवणकर, कृषि विज्ञान केंद्र हिवराचे कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.नरेंद्र देशमुख, तहसिलदार टी.आर.भंडारी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.अग्रवाल पुढे म्हणाले, महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करुन त्यांना सक्षम करण्याचे चांगले काम करीत आहे. महिला हया कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करतात. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुला विक्री केंद्रासाठी एक चांगला मॉल तयार करण्याच्या दृष्टीने माविमची स्वतंत्र इमारत तयार व्हावी तसेच महिला बचतगटाने उत्पादीत केलेल्या वस्तुला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून श्री.सोसे म्हणाले, महिलांचे सक्षमीकरण करणे, महिलांचा विकास करणे, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचावी हा यामागचा उद्देश आहे असे सांगितले. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्हारे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, कृषि विज्ञान केंद्र हिवराचे कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.नरेंद्र देशमुख, महिला व बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे, नगरसेविका भावना कदम, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध बचतगटांचे वस्तू व साहित्य विक्रीचे स्टॉलला मान्यवरांनी भेट देवून उत्पादीत केलेल्या वस्तूंच्या मार्केटींगबाबत माहिती जाणून घेतली. कार्यक्रमास दिनदयाल अंत्योदय योजनेचे कार्यक्रम व्यवस्थापक धनराज बनकर, उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष तुलसी चौधरी, व्हीकेजीबी कुडवाचे श्री.राणे, बँकेचे शाखा व्यवस्थापक, तसेच गोंदिया तालुक्यातील बचतगटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सनियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर, लेखाधिकारी योगेश वैरागडे, सहायक प्रफुल अवघड, एकांत वरघने, प्रिया बेलेकर व महिला बचतगटाच्या सहयोगिनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन मोनिता चौधरी यांनी केले. उपस्थितांचे आभार माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांनी मानले.