इंजिनीअरिंग मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा

0
9

मुंबई : राज्यात खासगी, विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कासाठी वेठीस न धरता त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये, असे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा संचालनालयाने दिला आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग या सामाजिक घटकांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क शासनाकडून देण्यात येते. शासनाने २००६-०७ या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचे धोरण मान्य केले आहे. यानुसार चालू शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्तीही शासनाकडून केली जाणार आहे. याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण शुल्क भरले नाही, म्हणून परीक्षेला बसण्यास महाविद्यालये मनाई करीत असल्याच्या शेकडो तक्रारी केल्या आहेत. याची दखल घेत संचालनालयाने हे आदेश दिले आहेत