काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची निवड

0
18

नवी दिल्ली -लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणा-या नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसने राज्यात नेतृत्वबदल केले असून खासदार अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक व त्यानंतर विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पार दैना उडाली होती. यापार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सोमवारी विविध राज्यांमध्ये नेतृत्व बदल केले. अशोक चव्हाण यांच्यासह दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अजय माकन, जम्मू-काश्मीर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी गौतम अहमद मिर, गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून भारतसिंह सोलंकी आणि तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी उत्तम रेड्डी यांची निवड करण्यात आली आहे.
तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या पाच प्रदेशाध्यक्षांची निवड केल्याचे पक्षाचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले.
काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्या जागी अशोक चव्हाण यांची निवड तर मुंबईचे प्रदेशाध्यक्ष जर्नादन चंदूरकर यांच्या जागी संजय निरुपम यांची वर्णी लागली आहे. सैफुद्दिन सोझ यांच्या जागी गुलाम अहमद मिर यांना निवडण्यात आले आहे. तर गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी अर्जुन मोधावाडिया यांच्या जागी भारतसिंह सोलंकी यांना निवडण्यात आले आहे.