८ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

0
8

गोंदिया,दि.९ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया यांचेमार्फत जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय तसेच जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समित्यामार्फत सर्व तालुका न्यायालयामध्ये ८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकअदालतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, एन.आय.ॲक्ट कलम १३८, बँक रिकव्हरीची प्रकरणे, मोटार वाहन अपघात प्राधिकरणाची प्रकरणे, वैवाहिक/कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे- भाडे, बँक वसुली, प्राधिकरणाची कर्ज वसुली प्रकरणे, विद्युत व पाणी बिलाची (चोरीची प्रकरणे सोडून) तसेच सर्वच प्रकारची तडजोडपात्र दाखल व दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल मदत करणार आहे.
तरी ज्या पक्षकारांना आपली दाखल प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीकरीता ठेवायची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयात तसा अर्ज २५ ऑगस्ट २०१८ पर्यंत सादर करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणाकरीता सर्व बँकांनी, संबंधितांनी किंवा अर्जदारांनी सुध्दा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथे किंवा तालुका विधी सेवा समितीकडे २५ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा. सर्व संबंधित पक्षकारांनी त्यांची प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तात्काळ निकाली काढून आलेल्या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव एम.बी.दुधे यांनी केले आहे.