नागपूर विभागात कृषी पंपांना बारा तास वीजपुरवठा – चंद्रशेखर बावनकुळे

0
13

भंडारा, दि.१०ः- : विभागात कमी पाऊस व खंडीत पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पिकांना संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नागपूर विभागातील सहा जिल्ह्यामध्ये कृषी पंपासाठी 12 तास थ्री फेज वीजपुरवठा देण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे केली.
नागपूर विभागातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा व गडचिरोली या जिल्ह्यातील कमी व खंडीत पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी पंपांना 12 तास थ्री फेज वीजपुरवठा करण्याची आवश्यकता असल्याबाबत संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी शिफारस केली होती. या शिफारसीनुसार कृषी पंपांसाठी दररोज 8 ते 10 तासाऐवजी 12 तास थ्री फेज वीजपुरवठा आवश्यकतेनुसार देण्याता येणार असल्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केले.
कृषी पंपांना 12 तास वीजपुरवठा करण्यासाठी राज्य विद्युत वितरण कंपनीने हा प्रस्ताव रितसर मंजूरीसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला असल्याचे सांगताना पालकमंत्री म्हणाले की, या निर्णयाची अंमलबजावणी 10 ऑगस्ट म्हणजे आजपासून सुरु करण्यात आली असून 12 तास वीजपुरवठा 10 ऑक्टोंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
कृषी पंपांना वीजपुरवठा करण्याच्या निर्णयामुळे नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील 2 लक्ष 30 हजार ग्राहकांना होणार आहे. यासाठी सुमारे 70 कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.
शेतकऱ्यांना 12 तास वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात सांगताना उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महावितरण कंपनीने फीडरनिहाय वीजपुरवठ्याचा तपशील सादर करणे आवश्यक राहणार आहे. या कालावधीतील पुरवठा करण्यात येणारा वीजेची नोंद घेण्यात यावी तसेच यासाठी मोबाईल ॲपचा उपयोग करतानाच स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करुन ताळेबंद ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, डॉ. पोतदार, माजी अध्यक्ष अशोक धोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.