उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरही व्यापारी संकुलाचा निर्णय लागेना

0
11
बिलोली (सय्यद रियाज) दि.१०ः-  येथील नगर परिषदेच्या वतीने राज्य महामार्गालगत व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.या व्यापारी संकुलातील गाळ्याच्या लिलावा ची चार वेळेस प्रक्रिया पार पाडूनही ठेव व भाडे परवडत नसल्याकारणाने व्यापाऱ्यांनी या लिलावाकडे पाठ फिरवली होती.या संदर्भात उप विभागीय अधिकारी व्ही.एल कोळी यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची बैठक घेऊन दिड महिन्याचा काळ लोटला असून अध्याय यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
    बिलोली नगर परिषदेने सन २०१३ मध्ये  १ कोटी ५१ लक्ष रूपयास महसुल विभागाची शहरातील दत्त टेकडीलगत असलेली जागा खरेदी करून त्या जागेवर व्यापारी संकूल व इमारतीच्या बांधकामासाठी २ कोटी ५० लक्ष रूपये खर्च केले.सन २०१७ मध्ये खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. शहराच्या मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन झाल्यानंतर शहर व परिसरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांना गाळ्यांच्या लिलावाची तर नगर परिषदेला प्रतिक्षा होती गाळ्यांच्या लिलावातून मिळणाऱ्या लाखो रूपयांच्या भाड्याची.माञ शासनाच्या नियमानुसार नगर परिषदेच्या व्यापारी गाळ्यांसाठी लागलेल्या खर्चाच्या हिशोबाने त्या गाळ्यांचे डिपाँझीट भाडे ठरविण्यात आले. व्यापारी संकुलावर झालेल्या खर्चा नुसार शासनाने  ९ लाख ८५ हजार ५७८ ते ८ लाख ५६ हजार ३९७ रूपये डिपाँझीट व ८ हजार २१४ रूपये ते ७ हजार १३७ रूपये एवढ्या  मासीक भाड्याचा दर ठरविला होता.पण शासनाने ठरविलेला गाळ्यांचा दर शहरातील व्यापाराचा विचार केल्यास नाकापेक्षा मोती जड असा असल्यामुळे शहर व परिसरातील व्यापाऱ्यांनी या लिलावाकडे पाठ फिरवली.यामुळे  न.पा प्रशासनाच्या वतीने काही प्रमाणात दर कमी करून  लिलाव प्रक्रिया राबविली तरीही  गाळे भाड्याने घेण्यास व्यापारी तयार होत नसल्यामुळे न.पा च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांची भेट घेऊन व्यापारी संकुलातील गाळ्या संदर्भात चर्चा केली होती.चर्चे अंती जिल्हाधिका-यांनी उप विभागीय अधिकारी बिलोली यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक घेऊन  प्रास्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते.जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार दि.१३ जून रोजी नगर परिषदेच्या वतीने न.पा येथे सकाळी ११ वाजता उप विभागीय अधिकारी व्ही.एल कोळी यांच्या अध्यक्षतेखाली बिलोली शहर व परिसरातील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत शासनाच्या वतीने ठरविण्यात आलेले दर शहरातील बाजारपेठ पाहता परवडणारे नसून ठेव रक्कमही जास्त असल्यामुळे या व्यापारी संकुलातील गाळ्याचे मासीक भाडे अडिच ते चार हजार,ठेक रक्कम साडेचार वरून एक लाख रूपये व ९ वर्षाच्या करारा ऐवजी करार वाढवून  दर ३ वर्षांनी करण्यात येणारी १५% भाडे वाढ करू नये अशी मागणी उपस्थित व्यापाऱ्यांनी केली होती.उप विभागीय अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तब्बल दिड महिन्या पेक्षा अधिकचा काळ लोटला असून यावर अध्याप कोणताच निर्णय झाला नसून शहरातील इतर दोन व्यापारी संकुला प्रमाणे हाही व्यापारी संकुल धुळ खात पडून आहे.याकडे जिल्हाधिका-यांसह लोक प्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.