आ.पुरामांच्या वाढदिवसानिमित्त दोन हजार नेत्र रुग्णांची तपासणी

0
6

आमगाव,दि.11 : सामाजिक व राजकीय जीवनात समाजकार्य करण्याची संधी सर्वांना उपलब्ध होते. यात अनेक व्यक्ती सक्रीयतेने सहभाग घेतात. या कार्यात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. आ. संजय पुराम यांनी सुरू केलेले समाजकार्य गतीशील व्हावे, जनतेची सेवा हेच जीवनाचे ध्येय असावे, असे मत भारतीय जनता पक्षाचे माजी विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील ग्राम ठाणा येथील गुरुकुल आश्रमशाळेत आयोजीत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व नेत्र शल्यक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार केशवराव मानकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार भेरसिंह नागपुरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, आमदार संजय पुराम, सविता पुराम, पणन सहकार लेखा समिती संचालक प्रा. सुभाष आकरे, जिल्हा परिषद सदस्य शोभेलाल कटरे, अ‍ॅड. येशुलाल उपराडे, अमोल शिक्षण संस्थेचे सचिव एच.एस. पुंडे उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व बिरसा मुंडा यांच्या छायाचित्रावर माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या वेळी आमदार पुराम यांनी, जनतेची सेवा करण्याची प्रत्यक्ष संधी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेनेच दिली आहे. या सेवेत कधीही खंड पडणार नाही, असे आश्वस्त करीत त्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमात केशवराव मानकर, भेरसिंह नागपुरे, अल्ताफ हमीद यांनीही मार्गदर्शन केले. संचालन करून प्रास्ताविक सविता पुराम यांनी मांडले. आभार जिल्हा परिषद सदस्य शोभेलाल कटरे यांनी मानले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश मटाले, अशोक पटले, योगेश्वरी पुंडे, ज्योती खोटेले, सुनंदा उके, अंजली जांभुळकर, यशवंत मानकर, राकेश शेंडे, राजू पटले, नरेंद्र बाजपेयी, हनवत वट्टी यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात नेत्र पेढी, जिल्हा अंधत्व निवारण यंत्रणा, जिल्हा आरोग्य विभाग यांच्यावतीने नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात दोन हजार नेत्र रुग्णांची तपासणी व ९५५ नेत्र पीडित रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. २१२ नेत्र रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेकरिता नोंदणी करण्यात आली.