सर्व ४८ जागा लढवणार-अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

0
14

नागपूर ,दि.11: आमची लढाई ही संविधान वाचवण्याची आहे. काँग्रेस संविधान मानणारी आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आम्ही आजवर ज्या समाजाला प्रतिनिधित्वच मिळालेले नाही, अशा वंचित घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी काँग्रेसकडे १२ लोकसभेच्या जागांचा प्रस्ताव ठेवला आहे, त्यावर अजून चर्चा सुरू असेल असे आम्ही समजतो. हा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला तर काँग्रेसची सत्ता येऊ शकते. अन्यथा आम्ही पूर्ण ४८ जागा लढवणार, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सत्ता संपादन निर्धार मेळावा व संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. तत्पूर्वी देशपांडे सभागृहात पार पडलेल्या संवाद मेळाव्याला राजू लोखंडे, माजी आमदार लक्ष्मण माने, अ‍ॅड. विजयराव मोरे, माना समाजाचे रमेश गजबे, धनगर समाजाचे रमेश देवाजी पाटील, हलबा समाजाचे डॉ. सुशील कोहड, प्रा. बी.के. हेडाऊ, अरविंद सांदेकर, सागर डबरसे, लटरू मडावी, अ‍ॅड. संदीप नंदेश्वर, अजय सहारे आदींनी मार्गदर्शन केले.