१५ ऑगस्टला अहेरी जिल्हा घोषित करा मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
10

अहेरी,दि.12ः- चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. अंतराच्या दृष्टीने खूप लांब, कठीण, भौगोलिक परिस्थिी, विकासापासून कोसो दूर असलेल्या अहेरी जिल्हा मात्र दुर्लक्षित राहीला. कमलापूर, जिमलगट्टा, आष्टी, आसरअल्ली, जारावंडी, पेरमिली या नवीन तालुक्याचा मावेश करून स्वतंत्र अहेरी जिल्हा येत्या १५ ऑगस्ट रोजी घोषित करण्यात यावा, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने अतिरिक्त जिल्हाधिकारी अहेरी यांच्यामार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
अहेरी विभागातील परिसर दुर्गम असून डोंगर दर्‍यांनी घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे. जिल्हा मुख्यालयापासून अंतराच्या दृष्टीने खुप लांब आहे. आवश्यक सुविधापासून वंचित असलेला हा भाग सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. या भागातील सुशिक्षित तरूणांना नोकरी, रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध होत नसल्याने बेरोजगारांची मोठय़ा प्रमाणात फौज निर्माण होत आहे. त्यामुळे या क्षेत्राचा संपूर्ण कायपालट केवळ अहेरी जिल्हा निर्मितीवर अवलंबून आहे. नवनिर्मितीशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही.
निवडणुकापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, खा. अशोक नेते यांनी अहेरी जिल्हा घोषित करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे अहेरी परिसरातील जनता उत्सुकतेने अहेरी जिल्ह्याच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत.
अहेरी या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा निर्मितीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी अहेरी जिल्हा घोषित करण्यात यावा, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, उपाध्यक्ष विलास रापर्तीवार, संघटक नागसेन मेर्शाम, सदस्य रवींद्र भांदककर, प्रशांत जोशी, श्रीनिवास भंडारी यांनी केली आहे.