दारू विक्रे त्याकडून लाच घेणारा पोलिस गजाआड

0
12

भंडारा,दि.13ः-मोहफुलाच्या दारूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या कारधा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस नायकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई ११ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास शहरातील राजीव गांधी चौकात करण्यात आली. सुनील बळीराम राठोड (३0) रा. भंडारा असे या पोलिस नायकाचे नाव आहे.
यातील तक्र ारदाराचा किरकोळ विनापरवाना मोहफुल दारु विक्र ीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय बिनदिक्कत सुरू ठेवण्यासाठी कारधा ग्रामीणचा पोलिस नायक सुनील राठोड हा दरमहा पाच हजार रुपये घेऊन जात असे. जर पैसे दिले नाही तर खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देत असल्याची तक्र ार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. या तक्र ारीच्या अनुषंगाने सापळा रचण्यात आला. सापळा कारवाई दरम्यान दारू व्यावसायीकाकडून दारूचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व त्याचेवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. राठोड याच्याविरोधात भंडारा पोलिस ठाण्यात कलम ७,१३,(१)(ड)१३(२) ला.प्र. कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी करीत आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, पोलिस हवालदार संजय कुरंजेकर, पोलिस नायक गौतम राऊत, सचिन हलमारे, रविंद्र गभने, शेखर देशकर, अश्‍विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, कोमलचदं बनकर, दिनेश धार्मिक यांनी केली.