१५ आॅगस्ट रोजी पाळणार ‘काळा दिवस’

0
15

भंडारा,दि.13 : जवाहर नवोदय विद्यालयाचा प्रश्न प्रशासनाने गांर्भियाने घेतलेला दिसून येत नाही. विद्यालयात शिकत असलेल्या ३६ विद्यार्थ्यांना अन्य सुरक्षित जागी हलविण्याचा प्रश्न अधांतरीच आहे. याउपर या वर्षीच्या ८० जागांच्या प्रवेश परिक्षेचा निकाल घोषित करण्यात आलेला नाही. परिणामी १५ आॅगस्टच्या दिवशी काळा दिवस उपोषणस्थळी पाळण्यात येणार आहे अशी घोषणा पत्र परिषदेत करण्यात आली.
नवोदय विद्यालय संदर्भात रविवारी उपोषणस्थळी पत्र परिषद घेण्यात आली. पत्र परिषदेला नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रविण उदापूरे, उपोषणकर्ते पालक व आंदोलक भाऊ कातोरे, विलास मोथारकर, प्रहार संघटनेचे मंगेश वंजारी यांनी संबोधित केले.
विशेष म्हणजे आजच्यापत्र परिषदेला नवोदय विद्यालयात अध्ययनरत विद्यार्थी सुध्दा उपस्थित होते. राहण्यास अयोग्य असलेल्या जकातदार कन्या शाळेच्या आवारात शिकत असलेल्या नवोदयाच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना पालकांच्या उपस्थितीत बाहेर काढू, असा इशारा देण्यात आला. सध्या ज्या ठिकाणी गरीब होतकरु विद्यार्थी शिकत आहेत. ती इमारत मोडकळीस आलेली आहे. असा अहवाल खुद्द प्रशासनानेच दिला आहे. तेव्हा ईमारत ढासळून विद्यार्थ्यांची जीवीत हानी झाल्यास यास सर्वस्वी जबाबदार भंडाराचे जिल्हाधिकारी राहतील असेही स्पष्ट करण्यात आले. उपोषणस्थळी निर्वाचित लोकप्रतिनिधीने भेट दिली नाही.नवोदय विद्यालयाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये मंगळवार १४ आॅगस्ट रोजी बंद करणार असल्याचे नागपूर विद्यापीठ छात्र संघाचे सचिव आकाश थानथराटे तसेच सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी पत्रकार परिषदेत घोषित केले. पालक लक्ष्मण निंबार्ते, शशिकांत देशभ्रतार, गणेश चेटुले, सविता हटवार, भाग्यश्री चेटूले, कोमल गजभिए, शालिनी झोडे, योगीता लांजेवार, सुरेखा पाखमोडे, महेंद्र कठाणे आदी उपस्थित होते.