स्वातंत्र्यदिनी अनुकंपाधारकांचा आत्मदहनाचा इशारा

0
7

तिरोडा,दि.13 : तिरोडा नगरपरिषदेतील मागील १५ वर्षांपासून आश्वासनावर जगत असलेल्या अनुकंपाधारकांचा संयम सुटल्याने त्वरित अनुकंपाधारकास नोकरीवर न घेतल्यास स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्र्यांसह प्रशासनास दिल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे.तिरोडा नगरपरिषदेतील १५ अनुकंपाधारकांनी अनेकदा मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी व संबंधितांशी आपल्याला नोकरी मिळावी म्हणून अनेकदा वयक्तिक भेटी घेऊन निवेदने देऊन तसेच मोर्चे काढून उपोषण केले. मात्र, प्रत्येकदा खोटी आश्वासने देऊन वेळकाढू धोरण अंगीकारण्यात आला. तिरोडा नगरपरिषदेतील १५ अनुकंपाधारकांपैकी काही अनुकंपाधारक वयोमर्यादा पार करण्याच्या जवळ असून जिल्हाधिकाऱ्यांकडून सेवाज्येष्ठता यादी मंजूर असताना व नगरपरिषदेत पदे रिक्त असतानाही अनुकंपाधारकांऐवजी बाहेरील व्यक्तींना नोकऱ्या देण्यात आल्या. नगरपरिषदेकडून १०-२० टक्के अट सांगण्यात येत असल्याने आपल्या अधिकारावर गदा आणून बाहेरील व्यक्तींना नोकऱ्या देत असल्याने आपल्यासमोर आत्मदहनाशिवाय पर्याय राहिला नसल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी १५ अनुकंपाधारक गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत. यास नगरपरिषद तिरोडा प्रशासन जबाबदार असल्याचे निवेदन तिरोडा नगरपरिषद अनुकंपाधारकांनी राज्याचे मुख्यमंत्री, नगर विकासमंत्री, पालकमंत्री, आमदार तिरोडा-गोरेगाव, नगराध्यक्ष तिरोडा, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार तिरोडा, पोलीस निरीक्षक तिरोडा, मुख्याधिकारी न.प. तिरोडा यांना दिल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. अनुकंपाधारकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. .