शिर्डीत समाधी शताब्‍दी निमित्त श्री साईसच्चरित पारायण सोहळा – सीइओ रुबल अग्रवाल

0
22

शिर्डी / मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.13 – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) आयोजित व शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने गुरुवार दिनांक १६ ऑगस्‍ट २०१८ ते गुरुवार दिनांक २३ ऑगस्ट २०१८ या कालावधीत श्री साईप्रसादालयासमोरील मैदानावर श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, श्री साईबाबांच्‍या समाधीस १८ ऑक्‍टोबर २०१८ रोजी शंभर वर्ष पुर्ण होत असून श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने समाधीचा शताब्‍दी सोहळा दिनांक ०१ ऑक्‍टोंबर २०१७ ते दिनांक १८ ऑक्‍टोंबर २०१८ या कालावधीत साजरा करण्‍यात येत आहे. या निमित्‍ताने वर्षभर धार्मिक, सांस्‍कृतिक, सामाजिक व प्रबोधनात्‍मक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. तसेच श्रावण मासानिमित्त दरवर्षी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) आयोजित व शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या पारायण सोहळ्याचे हे २४ वे वर्ष आहे. शताब्‍दी वर्षाच्‍या अनुषंगाने हा पारायण सोहळा भव्‍य स्‍वरुपात साजरा करण्‍याचा मानस आहे. त्‍यानुसार गुरुवार दिनांक १६ ऑगस्‍ट ते गुरुवार दिनांक २३ ऑगस्ट २०१८ या कालावधीत सकाळी ७.०० ते ११.०० यावेळेत श्री साईप्रसादालयासमोरील मैदानावर श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पारायण सोहळ्यानिमित्त दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून प्रथम दिवशी दिनांक १६ ऑगस्‍ट रोजी सकाळी ०६.०० वाजता समाधी मंदिरातून पोथी व फोटोची व्दारकामाईमार्गे पारायण मंडपापर्यंत मिरवणूक, ग्रंथ व कलश पूजन होवून पारायणास सुरुवात होईल. सायंकाळी ०४.०० ते ६.०० यावेळेत श्रीराम महिला भजनी मंडळ, गोवा यांचा भावगीत भक्‍तीगीत कार्यक्रम व रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत रविराज नासेरी, मुंबई यांचा साई भजन हा कार्यक्रम होणार आहे. दिनांक १७ ऑगस्‍ट रोजी सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत प्राथमिक विद्या मंदिर, शिर्डी यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम, सायं.०६.०० ते ०७.०० यावेळेत स्‍थानिक महिला मंडळ, शिर्डी यांचा हळदीकुंकू कार्यक्रम व  रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत प्रसाद कांबळी, मुंबई यांचा देवबाभळी हा नाटकाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक १८ ऑगस्‍ट रोजी सायं. ०४.०० ते ०६.०० यावेळेत कुडाळेश्‍वर मित्रमंडळ, कुडाळ यांचा दशावतारी हे नाटकाचा कार्यक्रम व रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत मनहर उधास, मुंबई यांचा साई भजन संध्‍या कार्यक्रम होणार आहे. दिनांक १९ ऑगस्‍ट रोजी सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत वसंतराव आजगांवकर, मुंबई यांचा स्‍वद नि‍नाद वाद्यवृंद “नाद विठ्ठल विठ्ठल” हा भजन कार्यक्रम व रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत नक्षत्र वाद्यवृंद, मुंबई यांचा महाराष्‍ट्र उत्‍सव कार्यक्रम होणार आहे. दिनांक २० ऑगस्‍ट रोजी सायं. ०४.०० ते ०६.०० यावेळेत शरद उपाध्‍य, मुंबई यांचा राशीचक्र कार्यक्रम व रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत प्रमोद पवार, प्रताप फड मुंबई यांचा नाटक-अनन्‍या हा कार्यक्रम होणार आहे. दिनांक २१ ऑगस्‍ट रोजी सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत श्री.नरेंद्र नाशिरकर, नागपूर यांचा संगीतमय साई विचार कथा कार्यक्रम व रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत कलापिनी कोमकली (कुमार गंधर्व संगीत अकॅडमी), देवास, मध्‍यप्रदेश यांचा भजन व अभंग कार्यक्रम होणार आहे. दिनांक २२ ऑगस्‍ट रोजी सायं. ०४.०० ते ०६.०० यावेळेत हरिश ग्‍वाला, मुंबई यांचा भजन संध्‍या कार्यक्रम व रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत सुनिल सरगम व राहुल गुप्‍ता, दिल्ली  यांचा श्रीकृष्‍ण रासलिला व शंकर भगवान तांडव नृत्‍य कार्यक्रम होणार आहे. दिनांक २३ ऑगस्‍ट रोजी सकाळी ०८.०० ते ०९.०० या वेळेत अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन ग्रंथ समाप्ती होणार असल्‍याचे सांगून सर्व कार्यक्रमांचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती अग्रवाल यांनी केले. श्री साईचरित्र पारायणासाठी बाहेरगावाहुन  येणाऱ्या पारायणार्थींसाठी संस्‍थानच्‍या वतीने साईधर्मशाळा (साईआश्रम ०२) येथे ५० हॉल व सप्‍ताहसाठी ५० हॉलची निःशुल्‍क व्‍यवस्‍था केली असून यामुळे प्रत्‍येकी ०२ हजार भाविकांची निवासाची व्‍यवस्‍था होणार आहे. तसेच साईसेवकांसाठी ३२ हॉलची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. याबरोबरच साईधर्मशाळा येथे तात्‍पुरत्‍या निवास व्‍यवस्‍थेकरीता ४५ हजार स्‍के.फुटाचा ०२ हजार भाविकांची क्षमता असलेला टेंट (मंडप) उभारण्‍यात आला आहे. तसेच साईआश्रम ०१ परिसरातील टेन्‍साईल फॅब्रीक शेड मध्‍ये तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात ०१ हजार भाविकांची निःशुल्‍क निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असून पारायणार्थींसाठी साईआश्रम ०१ येथे सशुल्‍क निवास व्‍यवस्‍था ही करण्‍यात येणार आहे. हा पारायण सोहळा यशस्वीरित्या पारपाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, पोलिस उपअधिक्षक आनंद भोईटे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख, सर्व ग्रामस्‍थ व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.