अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणार्या ट्रकसह 9 लाखाचा माल जप्त

0
10
मौदा,दि. 13(शैलेष रोशनखेडे) – रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांना राष्ट्रीय महामार्गावरुन जाणारा एक ट्रक संशयास्पद वाटल्याने माथनी टोलनाक्यावर नाकाबंदी करून ट्रकची तपासणी केली असता 37 जनावरे ट्रकमध्ये असल्याचे आढळल्याने ट्रक ताब्यात घेतले.सोबतच याप्रकरणात दोन आरोपींना अटक करीत ट्रकसह 9.20 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई मौदा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक किशोर नारायणे, पोलिस शिपाई अविनाश शेळकेे यांनी रात्रीगस्तीवर असतांना (दि.13)रात्री 1.45 वाजता केली. मौदाजवळील रबडीवाला टि पॉईंटजवळून नागपूरकडे जाणारा ट्रक क्र. एमएच 40 वाय 1348 संशयास्पद वाटल्याने सदर ट्रकबाबत माथनी टोलनाका येथे असलेले पोलिस उपनिरिक्षक अतुल कावळे यांना माहीती दिली.तसेच ट्रकचा पाठलाग करीत माथनी टोलनाका येथे नाकाबंदी करीता असलेले कर्मचारी उपनिरिक्षक अतुल कावळे, हवालदार जंगवाड, शिपाई जितेंद्र बोरकर यांचे मदतीने ट्रक अडविण्यात आला. ट्रकमध्ये 37 जनावरे होती व त्यांची किंमत अंदाजे 3 लाख 70 हजार रूपये तसेच ट्रकची किंमत अंदाजे 5 लाख 50 हजार रूपये असा 9 लाख 20 हजार रूपयाचा माल ताब्यात घेऊन आरोपी सुधिरसिंग महाविरसिंग बैस (33 वर्ष), कलाम कदीर खान (33 वर्ष) दोघेही रा. आमगांव जि. गोंदिया यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.