शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी- पालकमंत्री संजय राठोड

0
13
  • वाशिम येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
  • ग्रामीण आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ सुरु होणार
  • जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्मिती करण्यावर विशेष भर

वाशिम, दि. १५ :   जिल्ह्यातील शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, यासाठी जलयुक्त शिवार अभियान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना यासह अन्य कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, नगराध्यक्ष अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. प्रत्येक पात्र कर्जदार सदस्यास दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. पावसाचा जमिनीवर पडणारा थेंब शिवारातच अडविण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला जिल्ह्यात चांगले यश मिळाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जलयुक्त शिवार अभियानातून ९ हजार ४१६ कामे पूर्ण होऊन ६५ हजार ७९५ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे ५८ हजार ९०१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना संरक्षित सिंचनाची सोय झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, यावर्षी जून अखेरपर्यंत वाशिम पाटबंधारे मंडळ अंतर्गत ८ लघु प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्याने या प्रकल्पात २७.५२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे ५ हजार २९१ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्मित झाले आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेतून जिल्ह्यातील १८ प्रकल्पांना १४२ कोटी ५० लक्ष अनुदान मिळणार आहे. यामधील ९ प्रकल्पांची घळभरणी पूर्ण झाली आहे. उर्वरित प्रकल्पांचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

यंदा मनरेगा मधून जिल्ह्यात ६ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.  शेतकऱ्याच्या उत्पादनाला संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविली जात आहे. सन २०१७-१८ मध्ये या योजनेतून ७८ हजार १३५ शेतकऱ्यांना ७६ कोटी २० लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यावर्षी जिल्ह्यातील १ लक्ष ९२ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून जिल्ह्यात ५६ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १ कोटी १२ लक्ष रुपये भरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे या कुटुंबाना आर्थिक आधार मिळाला आहे. शेती व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आखलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री. राठोड यांनी यावेळी केले.

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यात हेल्थ अँड वेलनेस सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये सर्व आरोग्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत. जिल्ह्यात उपकेंद्रात १६२ बी. ए. एम. एस. डॉक्टरांची नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याची सुविधा निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले की, जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील ७०४ किलोमीटर रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट होते. पैकी एकूण १६० किलोमीटर लांबीच्या १४ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वारीत कामेही पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सावरगाव फॉरेस्ट गावाच्या रस्त्याचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ४८३ शाळा प्रगत झाल्या असून ४८४ शाळा डिजिटल झाल्या आहेत. तसेच साखरा येथील जिल्हा परिषद शाळा आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. वाशिम येथे केंद्रीय विद्यालय सुरु करण्यास नुकतीच केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुलांना अत्याधुनिक शिक्षणाची सुविधा निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले. तसेच मुलीच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातून झालेल्या कामांमुळे मुलींचे प्रमाण १००० मुलांमागे ९५३ पर्यंत पोहचले असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ३९१ गावांमध्ये विस्तारित ग्राम स्वराज अभियान राबवून केंद्र शासनाच्या महत्वाच्या ७ योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आला आहे. यामध्ये २० हजार ३६० कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून मोफत घरगुती गॅसची जोडणी देण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात सौभाग्य योजनेतून २ हजार ६३ घरांमध्ये वीज जोडणी देवून ही घरे प्रकाशमय करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा तिसरा टप्पा यावर्षी जुलै महिन्यात पार पडला. यामध्ये वाशिम जिल्ह्याने १२ लक्ष ८३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना २६ लक्ष ८७ हजार रोपांची लागवड करून २०९ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. ही आपल्यासाठी आनंदाची बाब असेही ते यावेळी म्हणाले.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध पुरस्कारांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शिरसाट यांनी केले.