देवरी तालुक्यातील डोंगरगावला वादळाचा तडाखा

0
28
अर्ध्या गावातील घरांचे छप्पर उडाले
विजेचे खांब पडल्याने संपूर्ण गाव अंधारले
झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड
मुख्य रस्त्यावर झाडे पडल्याने गावातील वाहतुक प्रभावीत
घटना घडल्यानंतर तब्बल 17 तासानंतर प्रशासनाली आली जाग

.देवरी,दि.16- देशात स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापनदिन साजरा होत असताना देवरी तालुक्यातील डोंगरगाववासीयांवर निसर्गाने आपली अवकृपा दाखविली. गावकरी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करीत असताना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अचानक अस्मानी संकट गावकऱ्यांवर कोसळले आणि बघता बघता अर्ध्या गावातील घरांची छते वादळाने उडवून नेली. काही घरे तर पूर्णतः कोसळली. गावात मुख्य रस्त्यांवर मोठाली झाडे पडल्याने वाहतून अवरुद्ध झाली. गावात रात्री त्या घरांत चुली पेटल्या नाही. डोक्यावरचे छप्पर गेल्याने घरातील साहित्याची नासधूस झाली. एवढे मोठे अस्मानी संकट तालुक्यातील एका गावावर कोसळले तरी तालुका प्रशासनाला पाझर फुटला नाही. लोकप्रतिनिधी गावात पोचले. मात्र. साहेबांचा पत्ता नाही. सर्वत्र प्रशासनाच्या नावाने बोटे मोडल्यानंतर तब्बल 17 तासाने प्रशासनाला जाग आली. आतातरी प्रशासन क्षतिग्रस्त गावकऱ्यांना भोजनाची तत्काल मदत आणि झालेल्या नुकसानीची भरपाई करेलअशी भाबडी आशा डोंगरगाववासींना आहे. आधीच दुष्काळाच्या गर्तेत भरडलेल्या आपतग्रस्ताना शासन मदतीचा हात देईलअशी रास्त मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसारदेवरी तालुक्यातील डोंगरगाव येथे स्वातंत्र्यदिन साजरा केल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण होते. अचानक सांयकाळी साडेपाचच्या दरम्यान आकाशात काळेढग दाटून आल्यानंतर कोणाच्याही ध्यानीमनी नसताना या गावाला वादळाने आपला हात दाखविला. बघता बघता अर्ध्या गावातील घरांचे छप्पर उडून गावकऱ्यांची दाणादाण झाली. सुमारे अर्धातास चाललेले निसर्गाचे तांडव गावात होत्याचे नव्हते करून गेले. काही घरे तर अक्षरशः कोसळली. यामध्ये एक बैल दबून मेल्याचे गावकरी सांगत आहेत. सुदैवाने सायंकाळची वेळ असल्याने मानवी जीवनाचे नुकसान झाले नाही. शेतकऱ्यांच्या शेतातील फळझाडे कोलमडल्याने शेतकरी अस्मानी संकटात भरडला गेला आहे. या गावातील ऐतिहासिक अशा डोये वाड्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. गावातील विजेचे खांब पडल्याने गावात अंधाराचे साम्राज्य आहे. गावातील लोकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे वृत्त हाती आले आहे
आज सकाळी या भागातील विधानसभा सदस्य संजय पुराम यांनी भेट देऊन गावाची पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला गावकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची सूचना दिल्याची माहिती आहे. याशिवाय झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलद गतीने करण्याचे सुद्धा निर्देश दिले आहेत. तत्पूर्वी पुराडा जिल्हा परिषद क्षेत्राचे जि.प. सदस्य दीपक पवार यांनी गावाला भेट देऊन झालेल्या प्रकाराची माहिती प्रशासनाला दिली.
उल्लेखनीय म्हणजे तालुक्यातील एका गावावर एवढे प्रचंड अस्मानी संकट आले असताना तालुका प्रशासनातील एकही अधिकारी आज (दि.16) सकाळी 10 वाजेच्या पूर्वी पोचला नव्हता. अनेक अधिकाऱ्यांनी तर बऱ्याच उशिराने या गावाला भेट देण्याचे सौजन्य दाखविले. यावरून या तालुक्यातील प्रशासन नागरिकांच्या प्रती कर्तव्यदक्ष (?) याची प्रचिता आली. एरव्ही नागरिकांवर कार्यवाहीसाठी आघाडीवर असलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जनतेने नाराजी प्रकट केली आहे.
 
झालेल्या नुकसानीचे योग्य मूल्यांकन करून शासन-प्रशासन लोकांना काय मदत करतेयाकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. कारण गेल्या दोन-तीन वर्षापासून या भागात दुष्काळाचे सावट असल्याने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर असे अनपेक्षित अस्मानी संकट आले आहे. या संकटातून सावरण्यासाठी मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावाअशी रास्त मागणी नागरिकांनी केली आहे.