राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांचे डिग्री जलाओ आंदोलन

0
11

गडचिरोली,दि.16 : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, शिष्यवृत्ती अदा करावी, ओबीसींची जनगणना जाहीर करावी आदीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी गडचिरोली येथील धानोरा मार्गावर राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी डिग्री जलाओ आंदोलन केले. दरम्यान यावेळी युवकांनी डिग्रीच्या झेरॉक्स प्रती जाळल्या.यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे, कार्याध्यक्ष किरण कटरे, तालुकाध्यक्ष सूरज डोईजड, राहुल भांडेकर, तुषार वैरागडे, वैभव जुआरे, अंकित सोनटक्के यांच्यासह बहुसंख्य युवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्ताधारी भाजपासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्षांच्या नेत्यांनी गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रतील ओबीसींच्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप महासंघाचे अध्यक्ष रूचित वांढरे यांनी यावेळी केला. याप्रसंगी ओबीसींची जनगणना जाहीर करा, आरक्षण पूर्ववत करा, ओबीसी जिंदा बाद, अशा प्रकारची नारेबाजी कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनापूर्वी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पत्र परिषद घेतली. राजकीय पक्ष निवडणुकीतील व्होट बँक म्हणून ओबीसी समाजाचा वापर करीत आहेत. विद्यमान केंद्र व राज्य सरकारकडून ओबीसींची फसवणूक होत आहे, असा आरोप वांढरे यांनी यावेळी केला.