राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी ख्वाजा बेग

0
9

यवतमाळ,दि.16 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी अखेर विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी बेग यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. यवतमाळसह १४ जिल्ह्यांच्या नियुक्त्या अनेक महिन्यांपासून रखडल्या होत्या. त्यावर अखेर तोडगा निघाला.
यवतमाळचे जिल्हाध्यक्षपद नानाभाऊ गाडबैले यांच्याकडे होते. परंतु दोन टर्मनंतर त्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर नव्या जिल्हाध्यक्षाचा राष्ट्रवादीमध्ये शोध सुरू झाला. वसंत घुईखेडकर, सुभाष ठोकळ, ख्वाजा बेग, उत्तमराव शेळके, राजू पाटील अशी काही नावे चर्चेत होती. नानाभाऊ गाडबैले यांना रिपीट करावे, असाही काहींचा आग्रह होता. नावांबाबत एकमत होत नसल्याने जिल्हाध्यक्षांची ही नियुक्ती गेली काही महिने साईडला पडली होती. अलिकडेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली. त्यात घुईखेडकर की ठोकळ या पैकी एकाचा निर्णय होणार होता. मात्र घुईखेडकरांच्या नावाला पक्षातील एका नेत्याने विरोध दर्शविला. त्याच वेळी दुसऱ्या नावाच्या समर्थकांची बैठकीतील ‘अभद्र वागणे’ अजितदादांना चांगलेच खटकले. त्यांनी या समर्थकांची झाडाझडती घेतली. त्यामुळे ही दोन्ही नावे बाद झाली आणि गाडबैले यांना रिपीट करायचे नव्हते, म्हणून ख्वाजा बेग यांचे नाव पुढे आले.