पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

0
19

वाशिम, दि. १६ :  स्वातंत्र्य दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण कराण्यात आले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नगराध्यक्ष अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा व मुख्याधिकारी गणेश शेटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, सेन्ट्रल रेल्वेचे उप संचालक, रेशीम विकास अधिकारी, कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी, मालेगाव सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, मानोरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, सचिन राऊत, आर. एस. कडू यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच कारंजा तालुक्यातील बेलमंडळ, रामनगर, काजळेश्वर, मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा, सोमठाणा, बोराळा कार्ली, मंगरूळपीर तालुक्यातील बिटोडा भोयर, लावणा, दस्तापूर, रिसोड तालुक्यातील देगाव, बिबखेडा, पेनबोरी, मानोरा तालुक्यातील हातना, भिलडोंगर, इंझोरी व वाशिम तालुक्यातील खरोळा, नागठाणा, मोहजा रोड ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवड मोहिमेत त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याने पालकमंत्री श्री. राठोड यांनी त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत एस. एम. सी. इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी प्राची घनशाम भोने व प्रभारी शिक्षक अभिजित जोशी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या कारंजा तालुक्यातील धामणी (खडी), रिसोड तालुक्यातील सवड व वाशिम तालुक्यातील टणका यांना पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.

पोलीस प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे,  सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक कैलास इंगळे, नायक पोलीस कॉन्स्टेबल विनोद चित्तकवार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील गंडाइत, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेषराव श्रावण शेजुलकर यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.