लोकशाही कायम ठेवण्यात माध्यमाची प्रमुख भुमिका-ना. बडोले

0
19
गोंदिया,दि.18:- संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडरानी म्हटले होते की, लोकशाही जिवंत राहण्यासाठी प्रसार माध्यमानी कुणाच्याही पायाशी लोटांगण घालायला नको. देशात प्रसार माध्यमाच्या माध्यमातुन लोकशाहीला जिवंत ठेवण्याचे कार्य केले जात आहे. सर्व सामान्याच्या समस्यांना वाचा फोडुन उपेक्षित व दुर्लक्षितांना न्याय मिळवुन देत असतांना पत्रकारांनी पित पत्रकारितेला बळी न पडता वास्तववादी लिखाण करावे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी केले.ते श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने राईस मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजीत टिळक गौरव पुरस्कार व जिल्ह्यातील १० वी व १२ वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुरस्कार वितरण समारंभात उद्घाटक म्हणुन बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. एच.एच. पारधी होते. मुख्य अतिथी म्हणुन जि.प. च्या अध्यक्षा सीमाताई मडावी, नगराध्यक्ष अशोकराव इंगळे, जि.प.च्या सभापती शैलजा सोनवाने, विश्वजीत डोंगरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके उपस्थित होते. यावेळी टिळक गौरव पुरस्काराचे मानकरी लोकमत समाचारचे उपसंपादक विकास बोरकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मान पत्र व रोख १० हजाराचे पुरस्कार देवुन सत्कार करण्यात आला. बोरकर यांंचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.प्रास्तविक संयोजक सावन डोये यांनी केले. जिल्ह्यात १२ वीच्या परीक्षेत प्रथम येणारा सरस्वती कनिष्ठ विद्यालय अर्जुनी मोरचा विद्यार्थी जयंत लोणारे याला स्मृतीचिन्ह व रोख ५ हजार रूपये, व्दितीय अभय देवराम चांदेवार सरस्वती कनिष्ठ विद्यालय अर्जुनी मोर याला स्मृतीचिन्ह व रोख ३ हजार, १० वीच्या परीक्षेत जिल्ह्यातुन प्रथम अवंती अजय राउत सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर हिला स्मृतीचिन्ह व रोख ५ हजार रूपये तर व्दितीय क्रमांकावरील तन्मय रामेश्वर खोब्रागडे व सलोनी योगेश पालीवाल यांना प्रत्येकी स्मृतीचिन्ह व रोख ३ हजार रूपयाचे पुरस्कार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. गोंदिया वृत्तपत्र विक्रेता असो.च्या वतीने वृत्तपत्र वितरण करणा-या पालकांतुन १० वीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण घेणारी विद्यार्थीनी खुशी देवेन्द्र रामटेके यांचे उके बंधु न्युज पेपर एजंसीच्या वतीने स्व. नत्थुजी बग्गाजी उके स्मृती प्रित्यर्थ ११०० रूपयाचे रोख पुरस्कार देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध गटातील पत्रकार पुरस्काराचे वितरण करण्यात आले.