ककोडी जि.प. शाळेला ग्रामस्थानी ठोकले कुलूप

0
7

देवरी,दि.22ः- तालुक्यातील ककोडी जिप हायस्कूलमध्ये मागील दहा वर्षांपासुन शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार निवेदने देऊनही शिक्षण विभाग दखल घेत नसल्याने मंगळवार दि. २१ रोजी शाळा व्यवस्थापन समिति व पालकांनी आक्रमक भूमिका घेत शाळेला कुलूप ठोकले.
शाळा व्यवस्थापन समितिने याआधी शिक्षकांची पदे भरण्यासाठी २0 तारखेपयर्ंत मुदत दिली होती. मात्र, कुठलीही कार्रवाई न केल्याने शेवटी ही भूमिका घ्यावी लागली. याची त्वरित दखल घेत देवरी पं.स.चे गटशिक्षणाधिकारी बी.बी. साकुरे यांनी परसोडी प्राथमिक शाळेतील शिक्षक एल.एन. बंसोड यांना प्रभारी शिक्षक म्हणून पाठविले. शाळा व्यवस्थापन समितिने त्यांना रूजू करून घेतले असले तरी जो पयर्ंत गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक पाठविले जात नाही तो पयर्ंत शाळेचे कुलुप उघडनार नसल्याचे निर्णय घेतले आहे. तसेच आठ दिवसांत समस्या मार्गी न लागल्याने समिती व पालकांद्वारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता दुसर्‍या शाळेत समायोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. एकीकडे मोठमोठय़ा बाता करणारे शिक्षण विभागाचे शिक्षक स्थानांतरण करण्यासाठी शासनाची दिशाभूल करतात, आंदोलन करतात. मात्र ककोडी सारख्या क्षेत्रात शिक्षक नसल्याने पालकांना आंदोलन करावे लागत आहे ही जिल्ह्यासाठी चिंतनाची बाब आहे. विशेष म्हणजे जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हमीद हे त्याच परिसरातील असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आता जि.प. पदाधिकारी व अधिकारी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक वर्ग या विषयाला घेऊन खंत व्यक्त करीत आहेत.