केरोसीनचे वाटपही होणार ई-पॉसद्वारे

0
7

गोंदिया,दि.22 : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, यासाठी धान्यापाठोपाठ केरोसीनचे वाटपही ई-पॉसद्वारेच करण्यात यावे, असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिले आहे. गोंदिया जिल्ह्यात चालू महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासाठी केरोसीनचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. शिवाय, विनागॅस जोडणी शिधापत्रिकाधारकांना आता अनुदानित केरोसीन मिळणार असल्याने पात्र लाभार्थीपर्यंत केरोसीन पोहोचेल असा पुरवठा विभागाला विश्वास आहे. .

अनुदानित केरोसीनचे वितरण केवळ विना गॅसजोडणी शिधापत्रिकाधारक व शासनाकडून प्राप्त सूचनेनुसार आधार क्रमांक सादर केलेल्या लाभार्थ्यांनाच करण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. रास्तभाव दुकानातील ई-पॉस मशीनद्वारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार प्रमाणिकरण झाले असल्यास केरोसीनचे वितरण करावे. तसेच आधार प्रमाणिकरण झाले नसल्यास इ-केवायसी करून केरोसीन द्यावे. आधार सीडिंग नसलेल्या सदस्यांचे इ-केवायसी करून केरोसीन द्यावे. दरम्यान, शिधापत्रिका, आधार नोंदणीची प्रत, शासकीय ओळखपत्र किंवा बँकेचे पासबुक आदी कागदपत्रे शिधापत्रिकेवरील प्रत्येक सदस्याकडून प्राप्त करून घेऊन केरोसीन वितरण करावे, परंतु हा पर्याय एकदाच वापरावा. नो नेटवर्क एफपीएस घोषित केले असल्यास त्या दुकानात पर्यायी व्यवस्था होईपर्यंत हस्तलिखित नोंद करून केरोसीन वितरण करावे. अशा परिस्थितीतही शिधापत्रिकाधारक हा गॅस जोडणीधारक नसल्याबाबतचे घोषणापत्र घेऊन व शिधापत्रिकाधारक हा विना गॅस जोडणीधारक असल्याची खातरजमा करूनच केरोसीन द्यावे. दरम्यान, ज्या रास्तभाव दुकानांमध्ये पॉस मशीन बसविण्यात आलेली नाही, अथवा ज्या दुकानातून केवळ केरोसीन वितरण करण्यात येते त्या दुकानामधून पात्र लाभार्थ्यांकडून केरोसीनचे वितरण प्रचलीत पद्धतीनेच करावे. हे करताना शिधापत्रिकाधारकाकडून आधार क्रमांक उपलब्ध करून घ्यावे, केरोसीन विक्रीबाबतच्या पावतीवर लाभाथ्र्याचे नाव व शिधापत्रिकेचा क्रमांक नोंद करावा. केरोसीन विक्रीबाबतच्या पावतीवर लाभार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी, असेही शासनाने जारी केलेल्या १ आगॅस्टच्या परिपत्रकात नमूद आहे..