मेळघाटातील साद्राबाडी गावात बसले भूकंपाचे १८ धक्के

0
6

अमरावती,दि.22 : जिल्ह्यातल्या मेळघाटातील साद्राबाडी या गावात मंगळवार आणि बुधवारच्या रात्री २.३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत भूकंपाचे तब्बल १८ धक्के बसले. या धक्क्यांची तीव्रता इतकी अधिक होती की, प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच्या एका घराला तडे गेले. त्याशिवाय आणखी एक घर कोसळले. वारंवार होऊ लागलेल्या या धरणीकंपामुळे मेळघातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविल्यानुसार भूकंप लहरींची शास्त्रीय कारणे तपासण्यासाठी तज्ज्ञांची टीम पाठविण्याबाबत नागपूर येथील विभागीय भूकंप विज्ञान केंद्राला मंत्रालयीन आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून कळविण्यात आले आहे.

धारणीनजिक साद्राबर्डी गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तात्काळ व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार उपविभाग प्रशासनाकडून गावात महसूल व पोलीस विभागातर्फे पूर्णवेळ आपत्ती व्यवस्थापन टीम नियुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी राहूल कर्डिले यांनी दिली.धारणी उपविभाग प्रशासन सर्व विभागांशी सतत संपर्कात असून उपविभागीय अधिकारी श्री. कर्डिले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.