नीलपंख झाला वर्धानगरीचा शहरपक्षी

0
13

वर्धा,दि.22 – बहार नेचर फाउंडेशन आणि वर्धा नगर पालिका यांच्याद्वारे आयोजित शहरपक्षी निवडणुकीत सर्वाधिक मते प्राप्त करीत भारतीय नीलपंख म्हणजेच इंडियन रोलर हा पक्षी वर्धानगरीचा शहरपक्षी म्हणून निवडून आला. तब्बल ५४ दिवस चाललेल्या या निवडणुकीची सांगता शुभंकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीलपंखाच्या विजयाने झाली. प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी मतमोजणीनंतर विजयी शहरपक्ष्याच्या नावाची घोषणा केली.
या निवडणुकीत एकूण ५१ हजार २६७ नागरिकांनी शहरपक्ष्याकरिता मतदान केले होते. त्यापैकी ४७ हजार ६४६ नागरिकांनी मतपत्रिकेद्वारे तर देशविदेशात स्थायिक झालेल्या ३ हजार ६२१ वर्धेकरांनी ऑनलाईन पद्धतीने मतदान केले. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत नीलपंखने १० हजार ९४० मतांपैकी ५ हजार ९८८ मते घेत आघाडी घेतली. पाच फेऱ्यांनंतर एकूण मतांच्या ५९ टक्के मते प्राप्त केलेल्या नीलपंखाच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अंतिम फेरीनंतर नीलपंखला २९ हजार ८६५ मते तर प्रतिस्पर्धी धीवर म्हणजेच किंगफिशरला ६ हजार ९५० मते प्राप्त झाली. याशिवाय कापशी घार ४ हजार ८८६, ठिपकेवाला पिंगळा ४ हजार ८०५ तर तांबट या पक्ष्याला ४ हजार १०५ मते प्राप्त झाल्याचे घोषित करण्यात आले.

या मतमोजणी उपक्रमात निवडणूक अधिकारी म्हणून या उपक्रमात आर्की. रवींद्र पाटील, राहुल तेलरांधे, डॉ. जयंत वाघ, जयंत सबाने, दीपक गुढेकर,वैभव देशमुख, स्नेहल कुबडे, राहुल वकारे, राजेंद्र लांबट, रामराव तेलरांधे, संहिता इथापे, विशाल बाळसराफ, विनायक साळवे, अपूर्व साळवे, लक्ष्मीकांत नेवे, दर्शन दुधाने, सन्मित्र बोबडे, अविनाश भोळे, पराग दांडगे, प्रा. पद्माकर बाविस्कर, प्राजक्ता भोळे, डॉ. ज्योती तिमांडे, प्रा. नितीन ठाकरे, प्रवीण कलाल, नितीन हादवे, मैथिली मुळे, जान्हवी हिंगमिरे, प्राजक्ता भोळे, प्राजक्ता कदम, अनघा लांबट, तारका वानखडे, डॉ. अभिजित खनके, पार्थ वीरखडे, विजय देशमुख, सुषमा सोनटक्के, राकेश काळे, सुनंदा वानखडे, कल्याणी काळे, संगीता इंगळे, कीर्ती येंडे, रत्ना रामटेके, किरण शेंद्रे, पंकज वंजारे, मोहित सहारे, प्रा. मोनिका जयस्वाल, प्रियांका देशमुख, नम्रता सबाने, रवी वकारे, बाबासाहेब जावळे, लक्षमीप्रिया पथक, शुभम जळगावकर यांनी जबाबदारी सांभाळली. या निवडणुकीच्या अंतिम निकालाची प्रत नगराध्यक्ष अतुल तराळे व मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्याकडे सोपविण्यात आली.