सीएसआरमधून विमानतळ प्राधिकरण करणार तीन शाळा डिजिटल

0
9

गोंदिया,दि.23:  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, खासगी शाळांच्या तुलनेत ते कुठेही मागे राहू नये, त्यांना सुद्धा डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण बिरसी विमानतळच्या वतीने सीएसआर निधी अंतर्गत गोंदिया तालुक्यातील बिरसी, खातिया, कामठा येथील तीन शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रती शाळा १५ लाख रुपये याप्रमाणे ४५ लाख रुपयांचा निधी भारतीय विमान प्राधिकरण बिरसी विमानतळातर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती बिरसी विमानतळाचे संचालक सचिन बी खंगारी यांनी दिली.
खासगी कंपन्याना सीएसआर अंतर्गत विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो. सीएसआर निधीतून पायाभूत व शैक्षणिक सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. भारतीय विमान प्राधिकरणा अंतर्गत बिरसी येथे विमानतळ उभारण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रिय दर्जाच्या विमानतळामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यामुळे भविष्यात रोजगार संधीत सुध्दा वाढ होण्याची शक्यता आहे. याच विमानतळ प्राधिकरणाने आता गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. बिरसी, खातिया, कामठा येथे जिल्हा परिषदेची शाळा असून यात परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहे.खासगी शाळांप्रमाणे डिजिटल शिक्षण व त्यासारख्या सुविधा या शाळांमध्ये सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सध्याच्या स्पर्धेच्या युगात मागे असल्याचे चित्र आहे. मात्र हे चित्र बदलण्यासाठी बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे आता पुढाकार घेतला आहे.सीएसआर अंतर्गत या तिन्ही शाळांना प्रत्येकी १५ लाख रुपये देवून या शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याची मोठी मदत होणार आहे.