बंदी उठवा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या

0
7

नागपूर,दि.24ः : प्राध्यापक पदभरतीवरील बंदी उठविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च शिक्षणमंत्री, वित्तमंत्री आणि अनेक आमदारांना निवेदने दिली आहे. मोर्चे काढून पाठपुरावाही केला. मात्र, विधानसभेत चर्चा झाल्यानंतरही बंदी उठविण्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविता येत नसेल तर पीएचडी, नेट, सेट पात्रताधारकांना आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.प्राध्यापक भरतीवरील बंदीविरोधात पीएच.डी, नेट आणि सेट पात्रताधारकांनी राज्यभर आंदोलन पुकारले असून संविधान चौक येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सुधारित आकृतीबंध व वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याच्या नावाखाली शासनाने २५ मे २०१७ रोजी शासनाने प्राध्यपक पद भरतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यात साहाय्यक प्राध्यापकांच्या ११ हजार ५०० जागा रिक्त असून सुमारे ५० हजार पात्रताधारक बेरोजगार असल्याचा आरोप पात्रताधारक आंदोलकांनी केला. .

नेट-सेट, पीएच.डी. कृती समितीच्या वतीने २० ऑगस्टपासून राज्यभर आंदोलन सुरू झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, राज्यात १ हजार १७१ अशासकीय अनुदानित महाविद्यालये असून, त्यात प्राध्यापकांची ३४ हजार ५३१ पदे मंजूर आहेत. मात्र, या पदांमधील केवळ २५ हजार २० पदे भरलेली असून, उरलेली ९ हजार ५११ जागा अद्याप रिक्त आहेत. त्यात सातत्याने वाढ होत आहे. .