तुमखेड्यात दारूबंदीसाठी मतदान आज

0
17

गोरेगाव,दि.२५ः-तुमखेडा बुजरूक गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी महिलांनी राज्य उत्पादनशुल्क विभागाकडे धाव घेतली. याची दखल घेत या विभागाने तहसीलदार कार्यालयामार्फत उद्या शनिवारी (दि.२५) जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तुमखेडा येथे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी महिला मतदान करणार आहेत.
तालुक्यातील तुमखेडा तीन हजारांच्या घरात लोकसंख्या असलेले गोंदिया-गोरेगाव महामार्गावरील छोटेसे गाव. या गावातील नागरिक उदरनिवार्हाकरिता शेती व मोलमजुरीचे काम करतात. गावात आर.एस.वंजारी या नावाने देशी दारूच ेदुकान व राधिका बार या नावाने एक बिअर बार आहे.
या दोन्ही दारू दुकानांमुळे गावातील तरूण, नागरिक दारूच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. परिणामी, संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. येथील ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या दहा असून, त्यत सहा महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. सरपंच म्हणून त्रिवेणी शरणागत आहेत. गावातील सुरू असलेले दोन्ही दारू दुकाने कायमची बंद करण्यात यावी. म्हणून महिलांनी वारंवार मागणी केली. २३ ऑगस्ट २0१७ व २३ जानेवारी २0१८ ला विशेषआमसभा बोलावून दारूबंदी करण्यात यावी, असा ठराव घेण्यात आला.
या ठरावानंतर जिल्हा प्रशासनाला दारू दुकाने बंद करण्याची रीतसर मागणी करण्यात आली. परंतु जिल्हा प्रशासनाने यावर कोणताही कार्यवाही केली नाही. महिलांनी एकत्र येत ग्रामसभेने घेतलेल्या ठरावासह निवेदन देऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारू दुकाने बंद करण्याची मागणी केली. या मागणीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने मतदान घेण्याकरिता तहसील कार्यालयाला कळविले आहे. दारूबंदीसवाठी महिलांचे आज शनिवारी (दि.२५) सकाळी ८  ते सायंकाळी ५ वाजेपर्यत मतदान होणार आहे. दारूबंदीकरिता आडवी बाटल व चालू राहण्याकरिता उभी बाटल असे मतदान चिन्ह असून, दारूबंदीकरिता पन्नास टक्के मतदान दारूबंदीच्या बाजूने होणे आवश्यक आहे.
दारूबंदीकरिता गुप्त मतदान व मतमोजणी पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणू नायब तहसीलदार एन.एम. वेदी काम पाहणार आहेत. गावात एकूण १0६६ महिला असून, यापैकी ५३३ मतांची दारूबंदीकरिता आवश्यकता आहे. मतदान प्रक्रियेनंतर कौल बंदीच्या बाजूने की दुकाने सुरू ठेवण्याच्या बाजूने जातो हे कळणार आहे.