तुमखेड्यात दारूबंदीच्या मतदानात आडव्या बाटलीचा विजय

0
11

गोरेगाव,दि.25- तालुक्यातील तुमखेडा बुजरूक गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी महिलांनी जिल्हाधिकारी व  राज्य उत्पादनशुल्क विभागाकडे धाव घेतली होती.त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आज  शनिवारी (दि.२५) जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तुमखेडा येथे दारुबंदीकरीता मतदान घेण्यात आले.या मतदानात 1052 महिलापैंकी गावातील 740 महिलांनी या मतदानात सहभाग घेतला त्यापैकी 638 महिलांनी आडव्या बाटलीच्या बाजूने मतदान करुन गावातील दारुबंदीवर शिक्कामोर्तब केले आहे.तर 149 महिलांना उभ्या बाटलीच्या समर्थानात मतदान केले.मतदानानंतर लगेच सांयकाळी 6 वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरवात झाली होती. तहसिल प्रशासनाने तालुक्यातीलच मोहगाव(बु.)येथील परशुराम विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक व तहसिल कार्यालयाचे अधिकारी मतदान केंद्रावर मतदान व मतमोजणीसाठी यांची मदत घेतली.

तालुक्यातील तुमखेडा तीन हजारांच्या घरात लोकसंख्या असलेले गोंदिया-गोरेगाव महामार्गावरील छोटेसे गाव. या गावातील नागरिक उदरनिवार्हाकरिता शेती व मोलमजुरीचे काम करतात. गावात आर.एस.वंजारी या नावाने देशी दारूच ेदुकान व राधिका बार या नावाने एक बिअर बार आहे. या दोन्ही दारू दुकानांमुळे गावातील तरूण, नागरिक दारूच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. परिणामी, संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. येथील ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या दहा असून, त्यत सहा महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. सरपंच त्रिवेणी शरणागत यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांच्या मार्गदर्शनात गावात दारुबंदीकरीता जनजागृती मोहीम सुध्दा राबविण्यात आली होती.त्यापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढम्यात आला होता.. गावातील सुरू असलेले दोन्ही दारू दुकाने कायमची बंद करण्यात यावी म्हणून महिलांनी वारंवार मागणी केली. २३ ऑगस्ट २0१७ व २३ जानेवारी २0१८ ला विशेष आमसभा बोलावून दारूबंदी करण्यात यावे असा ठराव घेण्यात आला होता.