सेवाग्राम येथे शुक्रवारपासून राज्य ग्रंथालय परिषद

0
13

नागपूर,दि.27ः-महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ मुंबईच्या वतीने सेवाग्राम येथे महात्मा गांधीजींच्या १५0 व्या जयंतीच्या पर्वावर ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय ग्रंथालय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . परिषदेचे उदघाटन ९१ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे हस्ते होणार असून याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .
महात्मा गांधींजीच्या शतकोत्तर जन्मशताब्दी निमित्ताने राज्य ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशनाचे आयोजन बापू कुटीत करण्यात आले असून दोन्ही दिवस गांधींचे विचारविश्‍व चर्चेचा मुख्य विषय असणार आहे . ३१ ऑगस्ट रोजी सकाळी परिषदेचे उदघाटन यावर्षी बडोदा येथे संपन्न झालेल्या ९१ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे हस्ते होईल , याप्रसंगी ह्ल गांधी काळ आज आणि उद्या ह्ल यावर अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे बीज भाषण करतील. गांधीजींचे अर्थशास्त्र एक अन्वयार्थ, यावर प्राचार्य डॉ. पुष्पा तायडे प्रक्षा टाकतील .
दुपारच्या सत्रात गांधीजींची पत्रकारिता आणि गांधीजी आणि ग्रंथालय यावर डॉ. विलास चिंतामण देशपांडे आणि डॉ. राजेंद्र मुंढे बोलणार आहेत . यानंतरच्या ग्रंथालय आणि अभ्यासिका काळाची गरज या सत्रात डॉ. राजशेखर बालेकर , अँड. भगवान शिंदे , श्रीराम देशपांडे , अनिल क्षीरसागर, अन्ना धुमाळ आणि श्रीकृष्ण साबळे सहभागी होतील . दुसर्‍या दिवशी सकाळी होणार्‍या परिसंवादात बा-बापू १५0 जयंती पर्व, गांधी आणि पर्यारण, आजचा युवक, आरोग्य , रचनात्मक कार्य तसेच गांधी आणि ग्रामविकास आदी विषयावर अनुक्रमे जयवंत मठकर , मुरलीधर बेल्खोडे , डॉ स्मिता वानखेडे , डॉ उल्हास जाजू , अतुल शर्मा आणि प्रा. अशोक मेहरे आपले विचार मांडतील. दुपारी ग्रंथालय संघाच्या कार्यकारिणीची बैठक होईल, खुल्या चर्चेनंतर समारोप कार्याध्यक्ष शिवकुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेत आणि प्रमुख कार्यवाह डॉ. गजानन कोटेवार यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होईल. राज्यभरातील ग्रंथालय संघ आणि चळवळीतील कार्यकर्ते या द्विदिवसीय परिषदेसाठी उपस्थित रहाणार असल्याची माहिती मुख्य आयोजक डॉ. गजानन कोटेवार यांनी कळविले आहे .