आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींना मिळणार मानधन

0
17

आवश्यक पुरावा व शपथपत्रासह अर्ज सादर करण्याचे आवाहन

वाशिम, दि. २७ सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा गौरव करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आणीबाणीच्या काळात एक महिन्यांपेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अथवा पतीस पाच हजार रुपये मानधन मिळणार आहे. तसेच एक महिन्यांपेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अथवा पतीस अडीच हजार रुपये मानधन मिळणार आहे. तरी सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देण्यासाठी बंदिवास सोसावा लागलेल्या वाशिम जिल्ह्यातील आपले अर्ज आवश्यक पुरावे व शपथपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गृह विभागात त्वरीत सादर करावेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींनी शपथपत्र अर्जासोबत जोडावे. शपथपत्राचा नमुना दि. ३ जुलै २०१८ रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाच्या परिशिष्ट ‘अ’ मध्ये देण्यात आला आहे. मिस अंतर्गत अटक झालेल्या व्यक्तींना मानधन मंजूर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना असतील. संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून मानधन मंजूर झालेल्या व्यक्तींची यादी शासनाकडे सादर करतील. या यादीनुसार संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास शासन निधी उपलब्ध करून देणार आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील अधिवासी असणे आवश्यक आहे. हे धोरण दि. २ जानेवारी २०१८ पासून लागू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.