नागपूर विद्यापीठात होणार चक्रधरस्वामी अध्यासन

0
20

नागपूर,दि.२८ः- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यासनानंतर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात दोन वर्षांअगोदर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते.नागपूर विद्यापीठात महानुभाव साहित्याचे वाचन, संशोधन व्हावे, वेगवेगळ्या दिशांनी या साहित्यांचा अभ्यास व्हावा, यादृष्टीने महानुभाव पंथाचे जनक श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावे अध्यासन सुरू करण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. शासनदरबारीदेखील यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. २०१६ साली मुख्यमंत्र्यांनीदेखील नागपूर विद्यापीठात हे अध्यासन सुरू करण्यात येईल व त्याला आर्थिक पाठबळही दिले जाईल, असे आश्वासन दिले होते.
यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे २३ जानेवारी २०१८ रोजी शासननिर्णय निर्गमित करण्यात आला होता व दोन कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला होता. याबाबतीत विद्यापीठाने प्रस्ताव तयार केला. १४ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या अधिष्ठाता मंडळाच्या सभेत हा प्रस्ताव सर्वात अगोदर सादर करण्यात आला. मंडळाने हा प्रस्ताव विद्यापरिषदेकडे पाठविला होता. १३ जून २०१८ रोजी झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. आता मंगळवारी हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.