ज्येष्ठ साहित्यिक संपतराव गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

0
10

जयसिंगपूर,दि.28ः- येथील डॉ. एस. के. पाटील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सदस्यांना एका सुंदर सोहळ्याचा आनंद घेता आला. कार्यक्रमाचे निमित्त होते, कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक संपतराव गायकवाड यांना भारतीय साहित्य आणि शिक्षण सेवेतील विशेष कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्याच्या समारंभाचे.संपतराव गायकवाड यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम थाटामाटात व अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. जयसिंगपूर कॉलेजचे माजी प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, जीवनगौरव प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, चांदीची नोट व ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप होते. जयसिंगपूर येथील डॉ. एस. के. पाटील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने चालविण्यात येणार्‍या ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक वाचनालय आणि कवितासागर साहित्य अकादमी यांच्या वतीने हा पुरस्कार तीन महिन्यातून एकदा देण्यात येतो. जिल्ह्यातील वा प्रसंगी जिल्हाबाहेरील ज्येष्ठ साहित्यिकांना या पुरस्कारासाठी निवडसमिती मार्फत निवडले जाते. कोणतेही अर्ज अथवा प्रस्ताव या पुरस्कारासाठी मागविले जात नाही. याच कार्यक्रमात प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांच्या ‘तत्त्वबोध’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

गौरवमूर्तींचा परिचय करून देतांना संपतराव गायकवाड यांच्या शिक्षक ते सहाय्यक शिक्षण संचालक पदापर्यंतचा प्रवास, त्यांनी दिलेल्या ३६ वर्षे आणि ७ महिने शासकीय सेवेचा आढावा आबासाहेब सूर्यवंशी यांनी घेतला.  कार्यक्रमाचे प्रायोजक मुकुंदराव गणबावले यांचा उल्लेख ‘उत्कृष्ट प्रशासक’ म्हणून तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांचा उल्लेख ‘एक उत्कृष्ट प्राचार्य व एक उत्कृष्ट व्याख्याता’ म्हणून प्राचार्य बी. बी. गुरव यांनी केला.सत्कारास उत्तर देतांना संपतराव गायकवाड यांनी त्यांच्या पुस्तकांचा धावता आढावा घेतला. ‘सगुणातील ईश्वर आई’ या त्यांच्या पुस्तकाविषयी बोलताना त्यांच्या डोळ्यातून घळा-घळा अश्रू वाहू लागले. सर्व सभागृह त्यांच्या वाक्चातुर्याने मंत्रमुग्ध झाले. ‘बाप समजून घेताना’ या पुस्तकाबद्दल बोलताना ‘तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी असतोच पण तो बापाविना पोरकाही असतो’ या त्यांच्या प्रतिपादनाने सभागृह अंतर्मुख झाले. याच पद्धतीने त्यांनी त्यांच्या सेवाकालातील अनेक भाव-विभोर घटनांचा उल्लेख अत्यंत वेचक व वेधक शब्दात केला.

प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात संपतराव गायकवाड यांचा गौरव करताना असे अधिकारी व असे लेखक अत्यंत दुर्मिळ आहेत असे सांगून ‘शाळा तपासणीला जाताना घरून जेवणाचा डबा नेणारे अधिकारी आता शोधूनही सापडणार नाहीत.’ असे आवर्जून सांगितले. ज्येष्ठांच्या निरामय आरोग्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले त्यांनी दिले. अल्प आहार, विपुल विहार, संयमी विचार व आचार ही चतु:सुत्री त्यांनी श्रोत्यांना पटवून दिली. त्यांच्या खुमासदार व विनोदी किस्से यामुळे व्याख्यानाची रंगत वाढत गेली. प्रिन्स सुनील पाटील याच्या हस्ते संपतराव गायकवाड यांच्या सहा पुस्तकांचा ग्रंथसंच ग्रंथालयाकडे सुपूर्द करण्यात आला. वाचनालयाचे सचिव बी. बी. गुरव व कवितासागर साहित्य अकादमीचे कार्यकारी संचालक डॉ. सुनील दादा पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन केले. आबासाहेब सूर्यवंशी यांनी खुमासदार व अभ्यासू शैलीत सूत्रसंचालन, स्वागत व प्रास्ताविक तर केलेच पण प्रारंभी त्यांनी म्हणलेली ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ ही प्रार्थना व समारोप प्रसंगी सुरेल आवाजात म्हणटलेले ‘वंदेमातरम्’ सर्वांची मने प्रसन्न करून गेले.

कार्यक्रमास अन्य ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी तसेच कवितासागर ग्रुप मधील अनेक कवी लेखक, तरुण साहित्यिक इत्यादी हजर होते. सौ. सुजाता गायकवाड आणि डॉ. बी. टी. पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. एकंदरीत आगळ्या वेगळ्या साहित्यिक कार्यक्रमाची मेजवानी ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवण्यास मिळाली. सौ. संजीवनी सुनील पाटील, प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य, डॉ. बी. ए. शिखरे, कवी श्रीधर कुदळे, कवी विजयकुमार बेळंके, सौ. शांता पाटील, सौ. मनीषा पिंटू वराळे, नंदकुमार गायकवाड, सागर किल्लेदार, गिरीश जाधव इत्यादी उपस्थित होते. आभार मानताना प्राचार्य डी. आर. खामकर यांनी संपतराव गायकवाड यांच्या शाळा तपासणीच्या वेळी घडलेले काही अनुभव सांगितले तत्पूर्वी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष डी. बी. चिपरगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.